टूडे साठी
--------------
कुंभमेळ्यातून होणार
‘जनगणना २०२७’चा प्रचार
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २२ : नाशिक- त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या गर्दीच्या अनुषंगाने केंद्र सरकारतर्फे ‘जनगणना २०२७’ चा व्यापक प्रचार करणार आहे. देशभरातून लाखो भाविक कुंभासाठी येणार असल्याने याच व्यासपीठावरून जनगणनेचा संदेश देण्याचे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयाच्या जनगणना संचालनालयाने दिले आहेत.
मुख्य प्रधान जनगणना अधिकारी तथा सहसचिव डॉ. निरुपमा जे. डांगे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांना याबाबत पत्र पाठवले आहे. महाराष्ट्रात जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रत्यक्ष मोजणी फेब्रुवारी २०२७ मध्ये होणार असून, त्यासाठी जनजागृती गरजेची असल्याचे पत्रात नमूद आहे. कुंभमेळा परिसरातील गर्दीच्या ठिकाणी असलेल्या एलईडी स्क्रीन, डिजिटल डिस्प्लेवर जनगणनेचे संदेश दाखवणे, लेझर-शो आणि ध्वनी- प्रकाश कार्यक्रमात माहिती देणे, शासकीय कार्यालये, महापालिका परिसर आणि सार्वजनिक ठिकाणी फलक, बॅनर लावणे, तसेच संकेतस्थळ आणि समाज माध्यमांवरून प्रचार करणे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाशी समन्वय साधावा, असेही निर्देश आहेत. प्रचाराचे अधिकृत साहित्य जनगणना आयुक्त कार्यालयाकडून दिले जाणार असून, जिल्हा प्रशासन आणि महापालिकेत समन्वयासाठी नोडल अधिकारी नेमण्याची विनंती करण्यात आली आहे.
--------------------