आता चहाची तलफ भागवणे झाले महाग!

आता चहाची तलफ भागवणे झाले महाग!
Published on: 
महागाईचा चटका; चहाचा घोट महागला दूध, साखर आणि इंधन दरवाढीचा फटका सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १३ : सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येक सुख-दुःखात साथ देणारा आपला लाडका चहा आता चांगलाच महागला आहे. वाढत्या महागाईचा फटका थेट चहाच्या टपऱ्यांपासून ते मोठ्या स्टॉलपर्यंत बसल्याने चहाप्रेमींसाठी ही खरोखरच कडू बातमी ठरली आहे. दूध, साखर, चहा पावडर आणि इंधनाच्या दरात झालेल्या वाढीमुळे चहा विक्रेत्यांनी दरवाढीचा निर्णय घेतला असून, आता तलफ भागवण्यासाठी खिशाला कात्री लावावी लागत आहे. पूर्वी पाच-सात रुपयांत मिळणारा कट चहा आता थेट १० रुपयांवर पोहोचला आहे, तर फुल चहासाठी १२ रुपये मोजावे लागत आहेत. शहरातील काही मोक्याच्या ठिकाणी आणि नामांकित अमृततुल्यांमध्ये तर फुल चहाचा दर १५ ते २० रुपयांपर्यंत गेला आहे. त्यामुळे ‘एक कट चहा दे ’ म्हणतानाही आता खिशाचा अंदाज घ्यावा लागत आहे. केवळ साधा चहाच नाही, तर चहाच्या बदलत्या ट्रेंडनुसार मिळणारे इतर प्रकारही महागले आहेत. थंडीच्या दिवसांत किंवा आरोग्याची काळजी घेणाऱ्यांची पसंती असलेल्या मसाला चहा आणि ब्लॅक टीसाठी आता २० रुपये मोजावे लागत आहेत. विशेष म्हणजे, साखर न घेणाऱ्यांना म्हणजेच ''विदाऊट शुगर'' चहा पिणाऱ्यांना चक्क २५ ते ३० रुपये मोजावे लागत आहे. तर, कॉफीचा दरही सरासरी २५ रुपयांवर गेला आहे. महागाईच्या या ''उकळी''मध्ये चहाची गोडी काहीशी कमी झाली असली, तरी खऱ्या चहाप्रेमींची ''तलफ'' मात्र त्यामुळे थांबणार नाही. ---चौकट परवडत नसल्याने महाग ग्राहकांचे बजेट कोलमडले असून दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग असलेल्या चहाचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच चटका बसत आहे. चहापत्ती, दूध आणि साखरेच्या किमतीत झालेली वाढ, तसेच इंधन आणि मजुरीचा वाढलेला खर्च यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. हॉटेल आणि टपरीचालकांची भूमिकेवर ग्राहक काहीसा नाराज आहे परंतु वाढत्या महागाईमुळे जुन्या दरात चहा विकणे परवडत नसल्याने दरवाढ करणे अपरिहार्य असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.