पान-१
----------------
YES26B00292
जुनी शेमळी (ता.बागलाण) ः येथील वसंत खैरनार यांच्या घरी सुरू असलेली पाचव्या माळेची चक्रपूजा.
------------------
कसमादे परिसरात चक्रपूजेची लगबग
------------
दुष्काळ महागाईचे सावट ः कुलदेवतेचे स्मरण, पूजेसाठी भाऊबंदांसह कुटुंब एकत्र
------------
येसगाव, ता.१५ ः कसमादे परिसरात दर तीन वर्षांनी पारंपरिक पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या चक्रपूजेची लगबग सुरू झाली आहे. ही पूजा नवरात्रीच्या पाचव्या, सातव्या, आठव्या व नवव्या माळेला केली जाते. यंदा दुष्काळासह महागाईचे चित्र असल्याने बळीराजासह सारेच विवंचनेत आहेत, मात्र कुलदेवतेच्या स्मरणाचा आणि तीन वर्षांनी येणाऱ्या या कुळाचारासाठी अवघा कसमादे परिसर सज्ज झाला आहे.
-------------
चक्रपूजेला लागणाऱ्या सोळ्या, सांजोऱ्या, करंज्या गोड व खाऱ्या पापड्या हे पदार्थ एक दिवस आधीपासून तयार करतात. चक्रपूजेच्या दिवशी भजे, कुरडया, पुरणपोळी, खीर, सारभात असा गोड व तिखट भजे तयार करून सर्व अकरा पदार्थ , त्यावर पुरणपोळी व वरती कणकेचे दिवे प्रज्वलित करतात आणि देवीला नैवेद्य दाखविला जातो. मागील वर्षापेक्षा यंदा सर्वच वस्तूंच्या किमती २० ते २५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
----------
चक्रपूजेसाठी लागणारे पदार्थ साखरेचे करतात, साखरेचा भाव किलोला ५८ रुपये तर गुळ ७५ ते ८० रुपये झाला आहे. आवडीनुसार तेल वापरल्यास तेलाची एक किलोचे भाव१५० ते २२० रुपये आहे. चणाडाळ १०० रुपये तर पीठ १२० रुपये किलो.पुरणपोळी साठी लागणारा लोकवन गहू चाळीस रुपये किलो आहे. रेडिमेड मांडे ८० रुपये नग आहे, त्यामुळे यंदा बजेट काहीसे विस्कळीत झाले आहे.
---------
चक्रपूजेसाठी लागणाऱ्या वस्तू तयार करताना महिला पारंपरिक पद्धतीला प्राधान्य देतात. पूजेचे साहित्य जमवणे आणि आवश्यक वस्तूंची खरेदी करणे, साहित्याच्या वाढलेल्या किमतींमुळे यंदा खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे काही कुटुंबांना पूजेचे साहित्य खरेदी करताना खर्चाचा विचार करावा लागत आहे.
१६-१
केवळ पूजा नव्हे संस्कृतीचा भाग
विविध झाडांचे पाने म्हणजे पत्री, तांदळाच्या चक्रावर ठेवले जातात. चार बाजूने दरवाजा करून चार प्रकारचे रखवालदार केले जातात. फळे तसेच फुले ठेवली जातात. ''अग्या हो, इसर अग्या हो ''च्या गजरात, देवीचा जयजयकार करण्यात येतो आणि होम पूजा करण्यात येते. चक्रपूजेचा प्रसाद खाण्यासाठी भाऊबंद, नातेवाईक मित्रमंडळी यांना आमंत्रित केले जाते. चक्रपूजा ही केवळ धार्मिक विधी नसून कसमादे परिसरातील पारंपरिक संस्कृतीचा एक भाग आहे. पिढ्यान्पिढ्या चालत आलेली ही परंपरा आजही महिलांनी जपली आहे. श्रद्धा, कौटुंबिक एकोपा आणि परंपरेचे जतन या भावनेतून महिला चक्रपूजेची तयारी करतात.
-----------------