चाळीसगावातील भेसळखोर ‘एफडीए’च्या रडारवर

चाळीसगावातील भेसळखोर ‘एफडीए’च्या रडारवर
Published on: 
पानासाठी मुख्य बातमी... चाळीसगावातील भेसळखोर ‘एफडीए’च्या रडारवर आठ दुकानांतील अन्न पदार्थांचे नमुने घेतले; अहवालानंतर कारवाई होणार सकाळ वृत्तसेवा चाळीसगाव, ता. ८ ः दिवाळीनिमित्त बाजारात सर्रास भेसळीचे विविध पदार्थ विकले जात असून नागरीकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे. याची अन्न व औषध प्रशासन विभागाने गंभीर दखल घेत, दोन दिवसांत शहरातील फरसाण व मिठाईची विक्री करणाऱ्या ११ दुकानांची चौकशी केली. या विक्रेत्यांकडील पदार्थांचे नमुने घेऊन ते छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेत पाठवले आहेत. त्याचा अहवाल झाल्यानंतर जे कोणी यात दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत ही विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. यात चाळीसगाव शहरातील मिठाई, फरसाण, खाद्यतेल तसेच प्रतिबंधित पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांच्या दुकानांची तपासणी करण्यात आली. शहरातील प्रसिद्ध चार मिठाई व फरसाण विक्रेत्यांसह चार केटरर्स अशा एकूण आठ ठिकाणी तपासणी करून खाद्यपदार्थांचे नमुने संकलित करण्यात आले. दिवाळीनिमित्त मिठाई, फरसाण, खाद्यतेल आणि इतर खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री होते. या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मिठाईवर चांदीचा वर्ख लावला जातो. मात्र, हा वर्ख खऱ्या चांदीचा आहे की बनावट अथवा आरोग्यास अपायकारक घटकांपासून तयार केलेला आहे, याची पडताळणी करणेही अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणी मोहिमेतील महत्त्वाचा भाग आहे. खाद्यतेलाचीही तपासणी दरम्यान, काही दिवसांपूर्वी शहरात दोन ठिकाणी पॅकिंग खाद्यतेलाची तसेच गुळाची तपासणी करण्यात आली होती. यावेळी तेलाचे नमुने घेऊन ते देखील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचे अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी सांगितले. त्यामुळे मिठाई व फरसाणबरोबरच खाद्यतेलाच्या गुणवत्तेवरही प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. कारवाईकडे लक्ष तपासणीदरम्यान संबंधित दुकानांमध्ये काही त्रुटी आढळल्या का तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक अथवा अन्य कारवाई करण्यात आली का याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. सध्या केवळ नमुने घेऊन तपासणी केलेली असल्याने प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच दोषी आढळून आलेल्यांवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. ---------------------- विविध पदार्थांची कमी दरात विक्री शहरातील मुख्य रस्त्यांवर दुकाने थाटून विविध खाद्यपदार्थांची कमी दरात सर्रास विक्री केली जात आहे. तेलाचे भाव १५० ते १६० रुपये किलो असताना शेव, फरसाण यासारखे काही खाद्यपदार्थांची या विक्रेत्यांकडून केवळ १२० ते १३० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. त्यामुळे कमी दरात विकले जाणारे हे खाद्यपदार्थ आरोग्यासाठी कसे काय चांगले असू शकतात? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. यासंदर्भात अन्न, औषध प्रशासन विभागाने दखल घेऊन अशा विक्रेत्यांची देखील चौकशी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. -------------------------पूर्ण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.