फोटो : H34926
‘नंदनवन’च्या श्रमदानातून
चांदशी पूल परिसर स्वच्छ
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १३ : चांदशी येथील नंदनवन हास्य क्लबच्या सदस्यांनी श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबवत चांदशी नवीन पूल परिसर स्वच्छ करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला आहे. या मोहिमेत अवघ्या तासाभरात एक किलोमीटर परिसरातील तब्बल अर्धा टन कचरा संकलित करण्यात आला.
चांदशी आणि गंगापूर रोडला जोडणारा हा नवीन पूल नागरिक व पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे. मात्र, दिवाळीतील फटाक्यांचे अवशेष, दारू-बिअरच्या रिकाम्या बाटल्या आणि फुटलेल्या काचांमुळे या परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले होते. दोन-तीन दिवस उलटूनही स्वच्छता न झाल्याने क्लबच्या सदस्यांनी स्वतः पुढाकार घेतला. हातात झाडू, हातमोजे आणि मुखपट्ट्या घेऊन वयोवृद्ध सदस्यांनीही मोठ्या उत्साहाने श्रमदान केले. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हा संकलित केलेला कचरा उचलून नेला. ज्येष्ठ पत्रकार प्रियदर्शन टांकसाळे, अध्यक्ष शरद मंडलिक, कार्याध्यक्ष अर्चना टांकसाळे, सचिव जे. आर. जाधव, किशोर देशमुख, धनराज पगार, सुनीता चौगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. यात अनुराधा देशपांडे, शांताबाई प्रधान, कमल उगले, लीला साळुंखे, जयश्री उपळाईकर, एस. एन. देवरे, सुनील पाखले आणि सुमन पवार यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.