CHD26B04821
चांदोरी ः चांदोरी गावदिवस कार्यक्रमाप्रसंगी गावातील गुणवंत विद्यार्थी, नोकरदार तसेच उद्योजकांच्या सत्काराप्रसंगी
------------
गाव सोडले, पण गावपण नाही, चांदोरीकर पुन्हा एकत्र
-----------
जिल्हाधिकारींकडून गाव व्हिलेज संकल्पनेचे कौतुक; गाव विकासासाठी मांडल्या विविध संकल्पना
-----------
सकाळ वृत्तसेवा
चांदोरी, ता.१४ ः नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणानिमित्त गाव सोडून दूरवर स्थायिक झालेली माणसे पुन्हा गावाच्या मातीशी जोडली जावीत, जुन्या आठवणींना उजाळा मिळावा आणि गावाच्या विकासासाठी एकत्रित विचारमंथन व्हावे, या उद्देशाने आयोजित ‘चांदोरी गाव दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. शनिवारी (ता.१४) चांदोरी गाव उत्सव समितीने ग्रामस्थांसह गावाबाहेर स्थायिक झालेल्या चांदोरीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
--------------
चांदोरी चौफुलीपासून सकाळी सजविलेल्या बैलगाड्या आणि ग्रामस्थांच्या सहभागातून ग्रामफेरी काढण्यात आली. गणपती मंदिर, स्टॅंड, देवी मंदिर आणि सोमेश्वर मंदिरमार्गे पुन्हा मारुती मंदिरात फेरीची सांगता झाली. पारंपरिक वातावरणात निघालेल्या या फेरीतून गावाची संस्कृती आणि एकजुटीचे दर्शन घडले. त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत आणि ‘आठवणीतील गाव’ या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. जुन्या छायाचित्रांच्या आणि आठवणींच्या माध्यमातून चांदोरीच्या गतकाळातील प्रवासाला उजाळा मिळाला. प्रसिद्ध व्यंगचित्रकार अवी जाधव यांच्या गावविकासाबद्दल व्यंगचित्र प्रदर्शन आयोजित केले होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर आव्हाड, सरपंच विनायक खरात, निर्मला खर्डे, पुष्कर हिंगणे, नंदू नाठे, अमृता टर्ले,डॉ. गोविंद वाईकर,प्रमोद हिंगमिरे, तुषार खरात आणि भय्या इनामदार उपस्थित होते.
गावातील उद्योजक तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या गुणवंतांचा विशेष सत्कार करण्यात आला. गावात उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या उद्योजकांचा गौरव तर स्पर्धा परीक्षांत यश मिळविणाऱ्या तरुणांचा सन्मान करून नव्या पिढीला प्रोत्साहन देण्यात आले. गाव सोडून शहरात स्थायिक झालेली माणसे पुन्हा एकत्र आली,जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि गावाच्या भविष्यासाठी विचारांची देवाणघेवाण झाली. गावाशी असलेली नाळ अंतरामुळे कधीच तुटत नाही, याची प्रचिती या उपक्रमातून आली. सायंकाळी गोदावरी आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.
वसंत टर्ले यांनी प्रास्ताविक केले. भूषण मटकरी यांनी सूत्रसंचालन केले. विष्णू कोरडे आणि मधुकर टर्ले यांनी आभार मानले. चांदोरी गाव उत्सव समितीच्या नियोजनातून गावपण जपणारा आणि गावाच्या विकासासाठी माणसे जोडणारा हा सोहळा संस्मरणीय ठरला.
-------------
चौकट
CHD26B04820
‘सकाळ’च्या ग्रामपुस्तिकेचा उल्लेख
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कार्यक्रमाला भेट देत चांदोरीकरांच्या गाव व्हिलेज संकल्पनेचे कौतुक केले. ‘सकाळ’च्या गावविषयक पुस्तकाबद्दल माहिती देत त्यांनी उपक्रमाचे स्वागत केले. गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन नियोजनबद्ध प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करत त्यांनी विविध विकासविषयक संकल्पना मांडल्या. गावाच्या प्रगतीसाठी स्थानिक नागरिकांचा सहभाग, उद्योजकांचे योगदान आणि तरुणांची सकारात्मक ऊर्जा महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
------------