NSK26H34989
चांदशैली : महिला बचत गटांना अर्थसहाय्य वाटप करताना.
---
चांदसैलीत महिला बचत गटांना
दहा हजारांचे अर्थसहाय्य मंजूर
नंदुरबार, ता. १४ : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताहांतर्गत चांदसैली (ता. शहादा) येथे लाभ वितरण मेळावा झाला. यात राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजनेंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या सात महिला बचत गटांना प्रत्येकी दहा हजारांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात आली.
चांदसैली ग्रामपंचायतीत आयोजित या मेळाव्यात न्यूक्लिअस बजेट योजनेंतर्गत निवड झालेल्या पात्र लाभार्थ्यांकडून धनादेश वितरणासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात आली. तसेच आदिवासी विकास विभागाच्या केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनांसह विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. आदिवासी विकास विभाग आणि महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांच्या संयुक्त प्रयत्नातून चांदसैली गावातील आदिवासी महिलांच्या १०० टक्के सहभागातून सात महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली. या बचत गटांना आदिवासी विकास विभागाच्या केंद्रवर्ती अर्थसंकल्पांतर्गत राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजनेंतर्गत प्रत्येकी दहा हजारांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. या अनुषंगाने मेळाव्यात आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. मेळाव्यास बचत गटांमधील सुमारे ७० महिला, तसेच पुरुष उपस्थित होते. या वेळी आदिवासी विकास विभागाचे प्रतिनिधी आणि तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार यांनी उपस्थितांना आदिवासी विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना, तसेच केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेची माहिती दिली.