ड्रोनच्या घिरट्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल
चांदवड तालुक्यात नागरिकांमध्ये चिंता; पोलिसांकडून चौकशी होणार
सकाळ वृत्तसेवा
चांदवड, ता. ६ ः तालुक्यातील विविध गावांमध्ये रात्रीच्या वेळी आकाशात ड्रोन घिरट्या घालत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी व यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांची जिल्हा प्रशासनाने दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली असून, निवासी उपजिल्हाधिकारी राजपूत यांनी पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवून घटनेची माहिती देत चौकशी करण्यास कळविले आहे.
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील काही ग्रामीण भागांत रात्रीच्या वेळी कमी उंचीवर ड्रोन उडताना दिसत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ड्रोन नेमके कोणाचे आहेत, कोणत्या कारणासाठी उडविले जात आहेत, तसेच त्यांच्या उड्डाणाबाबत आवश्यक नियमांचे पालन केले जात आहे का, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनुसार, चांदवड परिसर ‘ग्रीन झोन’मध्ये येत असल्याचे प्राथमिकदृष्ट्या गृहीत धरले जात आहे. उपलब्ध व्हिडिओ आणि प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या आधारे हे कमी उंचीवर उडणारे ‘नॅनो ड्रोन’ असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ड्रोन नियम, २०२१ नुसार नॅनो ड्रोनसाठी पूर्वपरवानगीची आवश्यकता नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच सध्या परिसरात ड्रोन उड्डाणाबाबत कोणतेही प्रतिबंधात्मक आदेश लागू नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
मात्र, अशा ड्रोनच्या उड्डाणाबाबत निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे अधिकृत माहिती किंवा पूर्वसूचना देण्यात आली आहे का, याची तपासणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
एखाद्या नागरिकाच्या खासगी जागेत अनधिकृत प्रवेश किंवा गोपनीयतेचा भंग होत असल्याचे वाटत असल्यास पोलिसांकडे तक्रार करता येऊ शकते. तसेच ड्रोनच्या वारंवार उड्डाणामुळे सार्वजनिक उपद्रव निर्माण होत असल्याचे वाटत असल्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १५२ अंतर्गत उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार करता येण्याची माहिती देण्यात आली आहे.
प्रशासनाच्या चौकशीतून ड्रोन कोणाचे आहेत, त्यांचा वापर कोणत्या उद्देशाने केला जात आहे आणि त्याबाबत आवश्यक ती अधिकृत माहिती प्रशासनाकडे आहे का, हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांमधील भीती व संभ्रम दूर करण्यासाठी चौकशीचा निष्कर्ष महत्त्वाचा ठरणार आहे.