टुडे एक : ॲंकर
---
(संग्रहित छायाचित्र वापरावे : एआय इमेज वापरू नये)
----
शीर्षक
पर्यटनाचे नियोजन; विमा नूतनीकरणासाठी धावपळ
वैधता तपासण्याची गरज; मुदत संपल्यास वाहनधारकांना ‘ऑनलाइन’चा पर्याय
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २७ : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावी जाण्याची किंवा कुटुंबासह पर्यटनाला निघण्याची तयारी सुरू असतानाच अनेक वाहनधारकांना विम्याची मुदत संपल्याचे लक्षात येत आहे. प्रवासासाठी वाहनाची सर्व्हिसिंग, इंधन आणि टायर तपासण्याची तयारी होते; मात्र विम्याच्या वैधतेकडे दुर्लक्ष झाल्याने ऐनवेळी नूतनीकरणासाठी धावपळ करावी लागत आहे. प्रवासादरम्यान वाहतूक पोलिसांच्या तपासणीत अडचण येऊ नये, तसेच अपघाताच्या वेळी आर्थिक जोखीम वाढू नये, यासाठी वाहनधारकांकडून विमा कागदपत्रांची जुळवाजुळव केली जात आहे.
दिवाळीच्या सुट्यांमध्ये खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते. लांब पल्ल्याच्या प्रवासापूर्वी वाहनाची तांत्रिक स्थिती तपासली जाते; परंतु विमा पॉलिसीची मुदत तपासण्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. प्रवासाच्या अगदी आधी विमा संपल्याचे लक्षात आल्यावर वाहनधारकांना तातडीने नूतनीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यामुळे सुट्टीच्या नियोजनात विम्याची वैधता तपासणेही महत्त्वाचे ठरत आहे.
ऑनलाइन नूतनीकरण
विमा कंपन्यांच्या अधिकृत संकेतस्थळांवरून आणि ऑनलाइन माध्यमांतून विम्याचे नूतनीकरण करता येते. त्यामुळे कार्यालयात जाण्यासाठी वेळ नसलेल्या वाहनधारकांनाही घरबसल्या प्रक्रिया पूर्ण करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, विम्याची मुदत संपली असल्यास केवळ नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू केली म्हणून वाहन विमाधारक झाले असे समजू नये. नवीन पॉलिसीची सुरुवात कधीपासून होणार आहे, याची खात्री करूनच वाहन रस्त्यावर आणावे.
विमा नसल्यास जोखीम
मोटार वाहन कायद्यानुसार सार्वजनिक रस्त्यावर वाहन चालविण्यासाठी वैध तृतीय-पक्ष विमा असणे आवश्यक आहे. विम्याशिवाय वाहन चालविल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. अपघात झाल्यास विम्याच्या प्रकारानुसार नुकसानभरपाईचा आर्थिक भारही वाहनधारकावर पडू शकतो.
चौकट
वाहनधारकांनी प्रवासापूर्वी काय तपासावे?
विम्याची मुदत, नूतनीकरणाची खात्री, पीयूसी प्रमाणपत्र, वाहन चालविण्याचा परवाना, पॉलिसीतील संरक्षण, कागदपत्रांची प्रत, वाहनाची तपासणी आदी तपासण्याची गरज असते.
कोट
दिवाळीच्या सुट्यांमध्ये वाहनाने बाहेरगावी जाण्यापूर्वी वाहनधारकांनी विम्याची वैधता तपासणे आवश्यक आहे. वैध तृतीय-पक्ष विमा नसताना वाहन चालविणे कायद्याने दंडनीय आहे. तसेच वाहनाचे पीयूसी प्रमाणपत्र, वाहन चालविण्याचा परवाना आणि इतर आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत.
- राजेंद्र वर्मा, प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव