मका व्यापाऱ्याची २१ लाखांत फसवणूक
फेसबुकवर रिल पाहून सौदा ठरला महागात; चौघांवर गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १९ : ‘फेसबुक’वर चांगल्या दर्जाचा मका स्वस्त दरात देण्याचे आमिष दाखवून चेन्नईच्या व्यापाऱ्याची २१ लाख ९४ हजार ४४० रुपयांत ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेन्नई येथील मूळ रहिवासी पी. व्ही. सुरेश (वय ४५, रा. चेन्नई, ह. मु. जळगाव) हे ''पद्मा सोर्स एक्झिम'' कंपनीच्या माध्यमातून अन्नधान्य खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. २८ सप्टेंबरला त्यांनी फेसबुकवर ''ऑल इंडिया मक्का सेल ग्रुप'' (श्यामलाल दवे) नावाचे पेज पाहिले. त्यावर महाराष्ट्रातून मका विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे व सोबत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले होते.
अशी ठरली ‘डील’
धान्य व्यापारी पी. व्ही. सुरेश यांनी फेसबुकवरील संबंधित क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर, संशयित श्यामलाल याने अमळनेर येथे चांगला मका उपलब्ध असल्याचे सांगत प्रति किलो २२.५० रुपये भाव ठरवला. त्यानंतर फिर्यादी हे १० ऑक्टोबरला चेन्नईवरून अमळनेर येथे आले. तेथे त्यांना विशाल शुक्ला आणि अविनाश पाटील यांनी अमळनेर येथील ''लामा जिनर्स वेअरहाऊस'' येथे मका दाखवला व जळगाव येथे मुक्कामासाठी नेले.
रक्कम ट्रान्स्फर
व्यवहार ठरल्यानंतर फिर्यादीने श्रावणी ट्रान्स्पोर्ट, संगमनेर यांच्यामार्फत तीन ट्रक अमळनेर येथे बोलावून ९६ टन ८५० किलो मका खरेदी करण्याचे ठरवले. संशयिताच्या सांगण्यावरून फिर्यादीने ''एएस ट्रेडिंग कंपनी''च्या (अजित जागरसिंग सिंधू) बँक खात्यावर आरटीजीएसद्वारे आणि टोकन म्हणून वेळोवेळी एकूण २१ लाख ९४ हजार ४४० रुपये ऑनलाइन ट्रान्स्फर केले.
माल न देता फसवणूक
पैसे दिल्यानंतर फिर्यादीने मक्याने भरलेले ट्रक सोडण्यास सांगितले, संशयितांनी ‘आम्हाला अजून पैसे मिळाले नाहीत, जोपर्यंत पैसे मिळत नाहीत तोपर्यंत माल देणार नाही, असे सांगत टाळाटाळ केली. त्यानंतर संशयितांनी ट्रकमधील माल खाली करून घेतला व फोन घेणे बंद केले. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादीने राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टलवर (NCCRP) तक्रार नोंदवली.
चौकट
चौघांवर गुन्हा दाखल
या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात संशयित श्यामलाल, विशाल शुक्ला (रा. नागपूर), अविनाश पाटील, अजित जागरसिंग सिंधू या चौघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर तपास करीत आहेत.