Powerat80 : शरद पवार म्हणजे विचारशिलांचं, विचारनिष्ठांचं अन् सकारात्मक कार्यनिपुण नेतृत्व! - छगन भुजबळ 

chhagn bhujbal and sp 1.jpg
chhagn bhujbal and sp 1.jpg

नाशिक : काँग्रेसचे सर्वांत तरुण अध्यक्ष होण्याचा मान शरद पवारांनी पटकवला. त्या वेळी त्यांचे वय होते, अवघे २४ वर्षे. १९६७ मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले आणि त्यांनी महाराष्ट्राचे प्रश्न हाताळाण्यास सुरवात केली. महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात शरद पवार हे नाव गाजायला लागले, ते १९७८ च्या मध्यापासून. पुलोदचा प्रयोग करत त्यांनी महाराष्ट्रात सरकार स्थापन केले आणि देशातले ते सर्वांत तरुण मुख्यमंत्री झाले. १९९१ मध्ये मी खऱ्या अर्थाने त्यांच्यासोबत काम करण्यास सुरवात केली.

गेली काही दशके ज्या नावाभोवती केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर देशाचे राजकारण फिरत आले आहे, ते नाव म्हणजे, शरदचंद्रजी पवारसाहेब. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या माणसाला हे नाव परिचित आहे. देशातही त्यांच्या नावाची वेगळी छाप आहे. शरद पवार या नावाचं ‘गारुडच’ देशभरात आहे, असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही. पवारसाहेब म्हणजे खऱ्या अर्थाने विचारशिलांचे, विचारनिष्ठांचे आणि सकारात्मक कार्यनिपुणता असलेले नेतृत्व आहे. आज शरद पवारसाहेब आपल्या संघर्षमय जीवनाची ८० वर्षे पूर्ण करत आहेत, त्याबद्दल मी सुरवातीलाच त्यांना शुभेच्छा देतो आणि दीर्घायुष्याबद्दल प्रार्थना करतो. - छगन भुजबळ, पालकमंत्री तथा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य 

मंडल आयोगाच्या शिफारशी लागू व्हाव्यात, हा मुद्दा घेऊन १९९१ मध्ये मी नागपूर अधिवेशनात नऊ आमदारांसह शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मला मिळाली. पुढे काँग्रेसपासून फारकत घेत पवारसाहेबांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्या वेळी आम्ही अनेक सहकाऱ्यांनी एका पावलावर पवार साहेबांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. 


यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या दूरदृष्टीच्या नेत्याने राज्याच्या विविध क्षेत्रांतील प्रगतीचा पाया रचला. राज्याच्या विकासाचा एक रोडमॅप त्यांनी आखून दिला. पुढे वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण यांनी त्या रोडमॅपचा विस्तार केला. महाराष्ट्राची पुरोगामी प्रतिमा अधिक बळकट केली. याच परंपरेचे एक महान पाइक असलेल्या शरद पवार यांना दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचा प्रत्यक्ष सहवास लाभला होता. त्यांच्याच आशीर्वादाने पवारसाहेब यांनी राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी राजकारण आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीच्या उत्थानाची सुरवात केली. समाजमनाची नेमकी जाण असलेल्या या नेत्याने शेतकरी, कष्टकरी, दलित, शेतमजूर, दुर्बल, मागासवर्गीय, उपेक्षित अशा वंचितांच्या उत्थानासाठी स्वतःला वाहून घेतले. 


समता परिषद मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी 
१ नोव्हेंबर १९९२ ला मी सामाजिक कार्यासाठी समता परिषदेची स्थापना केली. १९९३ मध्ये समता परिषदेचा पहिला मेळावा घेतला. जालना येथे झालेल्या या मेळाव्यात अध्यक्षपदी स्वत: पवारसाहेब होते. तत्कालीन समाजकल्याणमंत्री सीताराम केसरी, रामदास आठवले, शिवाजीराव शेंडगे, मधुकर पिचड यांच्यासह सुमारे दोन लाखांहून अधिक समता सदस्य आणि इतर मान्यवरही उपस्थित होते. याच मेळाव्यात आम्ही मंडल आयोग लागू करण्यात यावा, असा ठराव करून पवारसाहेबांकडे लागू करण्यासाठी मागणी केली. त्यानंतर तातडीने त्यांनी १९९४ मध्ये मंडल आयोग लागू केला. त्याचा फायदा महाराष्ट्रातील तमाम मागासवर्गीय बांधवांना झाला. मंडल आयोगाची मागणी यशस्वी झाल्यानंतर त्याचा आनंद सोहळा आम्ही १९९४ मध्ये अमरावतीत घेतला होता. याच मेळाव्यात मंडल आयोग लागू केल्याबद्दल पवारसाहेबांचे आम्ही महाराष्ट्रातील ओबीसी समाजातर्फे आभार मानले. या वेळी तत्कालीन केंद्रीय क्रीडामंत्री मुकुल वासनिक उपस्थित होते. 
पवारसाहेबांना देशातील सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, 
विज्ञान, कला, क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्रांविषयी सखोल जाण आहे. भारताला जागतिक स्तरावर अन्नधान्यात निर्यातदार देश बनविण्यात त्यांचे अनन्यसाधारण योगदान आहे. केंद्रीय कृषिमंत्री म्हणून सलग दहा वर्षे काम करताना त्यांनी देशाच्या शेती विकासासाठी रचनात्मक कार्य केले. एकेकाळी भारताला तांदूळ आयात करावा लागत असे, देशाची या गंभीर समस्येतून मुक्तता करण्यासाठी त्यांनी वैज्ञानिक व तज्ज्ञांची मदत घेतली. त्यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन केले. याचा परिपाक म्हणून जगात प्रथम क्रमांकाचा तांदूळ निर्यातदार देश म्हणून भारताची नवी ओळख निर्माण करून दिली. जागतिक स्तरावर गहू निर्यातीतही देशाला अव्वल स्थानावर पवारसाहेबांनी पोचवले. 


प्रशासकीय कामकाजात हातखंडा असलेल्या पवारसाहेबांनी सामाजिक क्षेत्रासाठीही मोठे काम केले आहे. मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने प्रभावीपणे केली होती. त्यासाठी मोठा लढा उभारावा लागला, यात पवारसाहेबांनी पुढाकार घेतला. जुलै १९९४ मध्ये मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले. मराठावाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या काळात मराठवाड्यात दंगली पेटल्या होत्या, त्या शांत करून लोकांमध्ये जातीय सलोखा घडवणे अतिशय गरजेचे होते. पवारसाहेबांनी त्यातही मोलाची कामगिरी करून दंगली थांबवल्या. ओबीसी समाजाच्या पाठीशी ते नेहमीच खंबीरपणे उभे राहिले. 


चव्हाणसाहेबांचे विचार 
राज्याचा सर्वांगीण विकास करावयाचा असेल, तर सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे, त्याचबरोबर निर्णय प्रक्रियेत खऱ्याखुऱ्या लाभार्थींना सहभागी करून घेतले पाहिजे. हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांचा विचार समोर ठेवून त्यांनी या सत्तेच्या विकेंद्रीकरणाला अधिक व्यापक स्वरूप दिले. निर्णय प्रक्रियेत महिला तसेच मागासवर्गीयांना सामावून घेण्यासाठी या दोन्ही वर्गांसाठी आरक्षण लागू केले. त्यामुळे आज सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थांमध्ये या दोन्ही वर्गांना आपल्या आशा-आकांक्षा व्यक्त करण्यासाठी हक्काचे स्थान मिळाले आहे. मला आठवते, की आम्ही नागपूरला समता परिषदेचा मेळावा घेतला होता. त्या मेळाव्यात पवारसाहेबांनी राज्यपातळीबरोबरच आता ओबीसींचे संघटन करण्यासाठी देशपातळीवर मेळावे घ्यावे, असा सूचनावजा आदेश दिला. त्यानंतर लगेचच २००५ मध्ये दिल्लीतील रामलीला मैदानावर मेळावा घेतला. मेळाव्यात केंद्रीय शिक्षण संस्थांमध्ये, नोकऱ्यांमध्ये ओबीसींना राखीव जागा देण्यात याव्यात, अशी मागणी केली. मेळाव्यास पवारसाहेब, लालूप्रसाद यादव, शरद यादव यांच्यासह देशभरातील प्रमुख मान्यवर तसेच पाच लाखांहून अधिक समता सदस्य उपस्थित होते. त्यानंतर बिहार, राजस्थान, झारखंड, मध्य प्रदेशात मेळावा घेतला. १४ वर्षांपासून उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांना समता पुरस्काराने गौरवण्यात येत आहे. त्यात वीरप्पा मोईली, अरुंधती रॉय, कुमार केतकर, शरद यादव, भालचंद्र नेमाडे, हरी नरके, उत्तम कांबळे, भालचंद्र मुणगेकर यांच्यासह समाजातील विविध मान्यवरांना गौरविण्यात आले होते. २०१८ मध्ये समता पुरस्कार पवारसाहेबांनी स्वीकारला. 
संकटाच्या काळात खचून न जाता विपरीत परिस्थितीवर विजय कसा मिळवायचा, पुन्हा विकासाच्या दिशेने झेप कशी घ्यायची, याचा आदर्श महाराष्ट्रातील जनतेसमोर मागच्या वर्षी शरद पवारसाहेबांनी उभा केला. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने २०१४ पासून असलेल्या सत्तेचा गैरवापर केला. या सत्तेचा वापर करून भाजपने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना पूर्णतः नामोहरम करण्यासाठी साम, दाम, दंड आणि भेद या सर्व तंत्राचा वापर केला. पण महाराष्ट्राच्या जनतेने कौल काही वेगळाच दिला. मोठा पक्ष असूनसुद्धा भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही. पवारसाहेबांच्या असाधारण योगदानातूनच महाविकास आघाडीची स्थापना झाली. 


तरुणांना लाजवेल, असे काम 
आज वयाच्या ८० व्या वर्षीही तरुणांना लाजवेल, अशा उत्साहाने पवारसाहेब रात्रंदिवस काम करतात. शरद पवारसाहेब म्हणजे राजकारण, समाजकारण आदी क्षेत्रांत कार्यकर्तृत्व गाजविण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या युवकांसाठी एक प्रेरणादायी दीपस्तंभ आहेत. फुले- शाहू- आंबेडकरांच्या महाराष्ट्राला पवारसाहेबांसारखा उदात्त आणि थोर सामाजिक दृष्टिकोन असणारा मुत्सद्दी नेता लाभला, ही बाब अभिमानास्पद आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com