-------------
NSK26H35108---- NSK26H3510--NSK26H3511-NSK26H35118 -NSK26H3511--NSK26H35117
नाशिक : छटपूजेनिमित्त रविवारी गोदाघाट परिसरात उत्तर भारतीय बांधवांनी पारंपरिक पद्धतीने सूर्यदेवाची पूजा केली. नदीकाठी पूजा साहित्य मांडून छटपूजा करताना उत्तर भारतीय महिला- पुरूष. (छायाचित्रे ःविकी कदम)
------------------
गोदाघाटावर अवतरला `मिनी उत्तर भारत’
---------
छटपूजेचा महाउत्सव; सूर्याला अर्घ्य देत कुटुंबासाठी महिला- पुरुषांची प्रार्थना
------------
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १५ : दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या तीरावर उत्तर भारतीय बांधवांचा पवित्र छटपूजा उत्सव रविवारी (ता.१५) उत्साहात व भक्तिभावाने पार पडला. शहरातील रामतीर्थ, गोदाघाट, तपोवन, दसक-पंचक, तसेच वालदेवी आणि नासर्डी नदीच्या विविध घाटांवर हजारोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती. मावळत्या सूर्यदेवाला अर्घ्य देत कुटुंबाची सुख-समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली. संपूर्ण गोदाकाठावर या निमित्ताने चैतन्याचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
छटपूजेचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. निसर्ग आणि सूर्यदेव यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा उत्सव आहे. या चार दिवसीय कठोर व्रतामध्ये महिला आणि पुरुष सलग ३६ तास निर्जळी उपवास करतात. पूजेसाठी बांबूच्या टोपल्यांमध्ये (सूप) ठेकुआ हा पारंपारिक गोड पदार्थ, ऊस, केळी, अननस, मुळा, नारळ, हळद, आले आणि विविध हंगामी फळे सजवून नदीकाठी आणली जातात. गुडघाभर पाण्यात उभे राहून सूर्यदेव आणि छठी मातेची मनोभावे पूजा केली जाते.
परराज्यातून नोकरी, व्यवसाय आणि रोजगाराच्या निमित्ताने नाशिकमध्ये स्थायिक झालेल्या उत्तर भारतीय नागरिकांचे सण-उत्सवांबाबतचे वेगळेपण या निमित्ताने प्रकर्षाने जाणवले. कुटुंबातील सर्व सदस्य, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक पारंपरिक वेशभूषेत या सोहळ्यात सहभागी झाले होते. नाशिकच्या स्थानिक नागरिकांनीही सोहळ्याचे स्वागत करत सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवले. ‘कर्मभूमी नाशिकने आम्हाला नेहमीच आपलेसे केले आहे. गोदामाईच्या साक्षीने छटपूजा करण्याचे भाग्य मिळाले, याचा मोठा आनंद आहे’ अशा भावना भाविकांनी व्यक्त केल्या.
---
गोदाकाठचा भक्तिमय माहोल
पहाटेपासूनच गोदाघाट आणि तपोवन परिसरात भाविकांची रीघ लागली होती. पारंपरिक छट गीतांचे सूर, पणत्यांचा लखलखाट, फुलांची सजावट आणि रांगोळ्यांमुळे नदीकाठ उजळून निघाला होता. महिलांच्या पारंपारिक वेशभूषेमुळे संपूर्ण परिसरात जणू ''मिनी उत्तर भारत'' अवतरल्याचा भास होत होता.
१६-१
पुरेसा बंदोबस्त तैनात
भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता नाशिक महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने चोख नियोजन केले होते. महापालिकेच्या वतीने सर्व घाटांची विशेष स्वच्छता करून निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र कलश ठेवण्यात आले होते. घाटांवर पुरेशी प्रकाशव्यवस्था (हायमास्ट दिवे), महिलांसाठी तात्पुरती चेंजिंग रूम्स आणि वैद्यकीय पथके तैनात होती. नदीपात्रात जीवरक्षक दलाच्या बोटी सज्ज होत्या. पोलिसांचाही मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.