‘मुक्त’च्या १९ हजार उत्तरपत्रिकांची अनधिकृत तपासणी
लासूर स्टेशनच्या छत्रपती शाहू महाविद्यालयातील प्रकार, प्राचार्यांसह ४८ जणांवर गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
लासूर स्टेशन, (ता. गंगापूर) ता. १६ : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या १९ हजार २३१ उत्तरपत्रिका संबंधित विषयांचे तज्ज्ञ नसलेल्या आणि अनधिकृत शिक्षकांकडून तपासून घेत विद्यापीठासह विद्यार्थ्यांची फसवणूक केली. लासूर स्टेशन (ता. गंगापूर) येथील छत्रपती शाहू कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या परीक्षा मूल्यमापन केंद्रात हा प्रकार घडला. यात विद्यापीठाकडून २ लाख ७६ हजार रुपयांचे मानधन लाटले. या प्रकरणी शिल्लेगाव पोलिस ठाण्यात महाविद्यालयाचे प्राचार्य, कॅप सेंटर संचालकांसह ४८ जणांविरुद्ध रविवारी (ता. १५) रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला.
मुक्त विद्यापीठाचे उपकुलसचिव (परीक्षा युनिट ३ व केंद्रीय मूल्यमापन कक्ष, नाशिक) मनोज नारायण घंटे (वय ५३) यांनी तक्रार दिली. हा सर्व गैरप्रकार २०२५ मध्ये ९ जून ते ४ जुलैदरम्यान झाला. विद्यापीठाने छत्रपती शाहू महाविद्यालयातील उत्तरपत्रिका तपासणी केंद्रावर काही अधिकृत प्राध्यापकांची परीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, संशयितांनी आपापसात संगनमत करून अधिकृत प्राध्यापकांचा केवळ बायोमेट्रिक अंगठा घेतला आणि उत्तरपत्रिका तपासण्याची ऑनलाइन लिंक आणि साइट उघडली. प्रत्यक्षात अधिकृत प्राध्यापक केंद्रावर उपस्थित नसतानाही, तेच पेपर तपासत असल्याचा भास निर्माण करणारे बनावट आयडी तयार केले. या माध्यमातून ज्यांना संबंधित विषयाचे ज्ञान नाही आणि जे विद्यापीठाकडून अधिकृत नाहीत, अशा दुय्यम आणि अनधिकृत शिक्षकांकडून १९ हजार २३१ उत्तरपत्रिका तपासून घेतल्या. यासाठी विद्यापीठाकडून २ लाख ७६ हजार ४१८ रुपयांचे मानधन उकळले. त्यातील काही रक्कम अनधिकृत शिक्षकांना देऊन उर्वरित रकमेचा अपहार करत विद्यापीठाचे नियम व कायद्याचे गंभीर उल्लंघन केले आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला. उपनिरीक्षक गणेश काळे तपास करीत आहेत.
यांच्यावर नोंद झाला गुन्हा
प्राचार्य डॉ. संदीप धिरडे, प्रा.डॉ. मधुकर साठे (कॅप सेंटर संचालक), दादासाहेब कऱ्हाळे (तांत्रिक सहायक), अंकुश पडाळे, प्रा. विशाल चपटे, ज्योती चव्हाण, डॉ. ए. एन. मस्के, डॉ. अविनाश भीमराव, विश्वनाथ बोबडे, डॉ. डी. एम. पंडिलवाड, डॉ. एच. एस. सातपुते, डॉ. रितांजली जाधव, डॉ. एन. जी. साळुंके, डॉ. पी. आर. मिसाळ, डॉ. एस. डी. वागवे, डॉ. एल. एस. दुग्गमवार, डॉ. व्ही. के. चव्हाण, डॉ. व्ही. एन. बागूल, डॉ. व्ही. एस. फुलारी, डॉ. वाय. ए. पाटील, डॉ. राजाभाऊ करपे, डॉ. एस. बी. सोलापुरे, दत्ता येरमुले, अशोक गायके, वसंतकुमार माळी, प्रा. बाळासाहेब राठोड, राजीव मोहिते, निर्मला सिरसाठ, राजेश्वर विभूते, प्रा. कृष्णा गवळी, कावेरी थोरे, डॉ. एस. बी. मनल, डॉ. आर. एस. पांचाळ, ऋषीकेश बनकर, जितेंद्र चव्हाण, पंडित चव्हाण, ज्ञानेश्वर धोत्रे, पी. एम. तुपे, प्रा. श्रुती चव्हाण, डॉ. बी. व्ही. वाहटुळे, डॉ. आर. एम. सरवदे, वंदना कांबळे, प्रा. प्रमोद भास्कर, गोकुळ पवार, सुयोग चव्हाण, रामेश्वर करपे, जयंत पठाडे, डॉ. संतोष जगन्नाथ जाधव.