पान मेन
---------------------
02868, 02867
चिखली : जळालेली डीपी. दुसऱ्या छायाचित्रात ग्रामस्थांशी चर्चा करताना कॉंग्रेसचे भानुदास गांगुर्डे .
आठ महिन्यांनी चिखलीत ‘प्रकाश''!
-
हालअपेष्टातील ग्रामस्थांना दिलासा; अखेर रोहित्र बसविले
-
सकाळ वृत्तसेवा
वार्सा, ता. १६ : साक्री तालुक्यातील चिपी-मोहाने ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या चिखली या आदिवासी गावातील रोहित्र जळाल्याने मागील आठ महिन्यांपासून वीजपुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. गावातील वीज वितरण रोहित्र (डीपी) जळाल्याने वीजपुरवठा खंडित होता. त्याचा परिणाम पाणीपुरवठा, मोबाइल नेटवर्क, विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि शेतीवरही झाला. वारंवार तक्रारी करूनही प्रश्न सुटत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर ग्रामस्थांचा अधिक रोष निर्माण होण्यापूर्वीच गुरूवारी (ता. १५) महावितरणाने डीपीची दुरूस्ती केल्याने चिखलीत पूर्ववत ‘प्रकाश'' उजळला आहे.
-
महिलांची पायपीट
आठ महिने गावातील वीजपुरवठा बंद राहिल्याने नळ पाणीपुरवठा योजनेवरही परिणाम झाला होता. परिणामी, महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी घरापासून दूर असलेल्या तलावातील झिऱ्यांवर अवलंबून राहावे लागले. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे गावातील मोबाइल टॉवरची सेवाही बंद होती, असे ग्रामस्थांनी सांगितले.
पिकांनाही फटका
वीज नसल्याने विद्यार्थ्यांना रात्री कंदील किंवा दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करावा लागला. दुसरीकडे, शेतीपंपांसाठी वीज उपलब्ध होत नसल्याने पिकांना पाणी देण्यात अडचणी आल्या. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे आधीच विविध समस्यांना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांपुढे चिंतेची स्थिती होती.
काँग्रेसकडून पाठपुरावा
गावाचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने चिखलीचे माजी उपसरपंच पिंटूभाऊ भारुडे यांनी ग्रामस्थांसह काँग्रेसचे माजी खासदार बापू चौरे आणि काँग्रेसचे साक्री तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डे यांची भेट घेतली. ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर गांगुर्डे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा केला. तसेच चिखलीला भेट देऊन स्थितीची पाहणी केली. यानंतर खासदार ॲड. गोवाल पाडवी यांच्याशीही संपर्क साधण्यात आला. ग्रामस्थांच्या समस्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्यास सांगण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
१४-१
वरिष्ठांच्या आदेशानंतर गुरूवारी (ता. १५) दुरूस्ती कामातून ट्रान्स्फार्मर सुरू केला. याकामी लाईनमन व वायरमन यांचे सहकार्य लाभले. त्यामुळे चिखलीत पूर्ववत वीजपुरवठा सुरू झाला आहे.
- गणेश जाधव, उपकार्यकारी अभियंता, साक्री