डोंगराळे बालिका अत्याचार-खून खटल्याचा निकाल १६ ला

डोंगराळे बालिका अत्याचार-खून खटल्याचा निकाल १६ ला
Published on: 
फोटो - 16056 मालेगाव : प्रसारमाध्यमांशी बोलताना ॲड. उज्ज्वल निकम ---- डोंगराळे बालिका अत्याचार-खून खटल्याचा निकाल १६ ला दोषी शेखर खैरनारला फाशीची शिक्षा देण्याची ॲड. उज्ज्वल निकम यांची मागणी; बचाव पक्षाचा अहवालावर आक्षेप सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. ७ : डोंगराळे (ता. मालेगाव) येथील बालिकेवरील अत्याचार व खूनप्रकरणी जलदगती न्यायालयात बुधवारी (ता. ७) शिक्षेच्या मुद्द्यावर महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. न्यायालयाने यापूर्वी आरोपी शेखर ऊर्फ विजय खैरनार याला दोषी ठरविले आहे. परिवीक्षाधीन अधिकारी, मानसोपचारतज्ज्ञ तसेच नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालांवर दोन्ही पक्षांनी युक्तिवाद केला. सरकार पक्षातर्फे ज्येष्ठ विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. या खटल्याचा अंतिम निकाल १६ ऑक्टोबरला जाहीर केला जाणार असल्याचे ॲड. निकम यांनी सुनावणीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जलदगती न्यायालयाचे न्यायाधीश के. जी. पालदेवार यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू आहे. सुनावणीनंतर ॲड. निकम यांनी सांगितले, की आरोपीला फाशीची शिक्षा का द्यावी, यासाठी सरकार पक्षाने न्यायालयासमोर चार प्रमुख मुद्दे मांडले. १६ नोव्हेंबर २०२५ ला बालिका मित्रांसोबत खेळत असताना तिला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून आरोपी तिला घेऊन गेला. त्यानंतर तिला गावातील नेहरू पुतळ्याजवळ सोडण्यात आल्याचे तपासात समोर आले. बालिकेला घेऊन गेल्याचे कोणी पाहिले आहे का, याची आरोपीने सुरुवातीला चाचपणी केल्याचा दावा सरकार पक्षाने केला. या बाबीवरून आरोपीने कृत्याचे गांभीर्य जाणूनबुजून व विचारपूर्वक केले असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. पीडिता खेळणाऱ्या मुलांमध्ये एकटीच मुलगी होती. गावातील मुले आरोपीला ‘दादा’ म्हणून संबोधत असत. आरोपीच्या कृत्यामुळे या संबोधनाचाही विपर्यास झाल्याचा मुद्दा ॲड. निकम यांनी मांडला. वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे बालिकेवर गंभीर स्वरूपाचा अत्याचार झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच, पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने बालिकेचा मृतदेह मोबाईल टॉवरजवळील कुंपणात टाकण्यात आल्याचा सरकार पक्षाचा युक्तिवाद असल्याचे ॲड. निकम यांनी सांगितले. या खटल्यात सातवर्षीय मुलाची साक्ष महत्त्वाची ठरली असून, ती न्यायालयाने विश्वसनीय मानल्याचे सांगण्यात आले. तसेच, बालिकेला आरोपी घेऊन जात असताना पाहिलेल्या एका महिलेची प्रत्यक्षदर्शी साक्षही महत्त्वाची ठरल्याचे ॲड. निकम यांनी सांगितले. तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि तत्कालीन उपअधीक्षक यशवंत बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली तपास करण्यात आला. आरोपीविरुद्ध ठोस पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आल्याचा दावा सरकार पक्षाने केला. फाशीच्या शिक्षेसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निवाड्यांचा संदर्भ देत ॲड. निकम यांनी सुमारे ५० मिनिटे युक्तिवाद केला. परिवीक्षा अधिकाऱ्यांनी डोंगराळे गावात जाऊन माहिती संकलित केली, तसेच कारागृह अधिकाऱ्यांनी आरोपीच्या कारागृहातील वर्तणुकीबाबत, तर मानसोपचारतज्ज्ञांनी त्याच्या मानसिक स्थितीबाबत अहवाल सादर केला. या अहवालांवरून आरोपीच्या गावातील तसेच कारागृहातील वर्तणुकीबाबत सरकार पक्षाने न्यायालयाचे लक्ष वेधले. आरोपीला मद्यपानाची सवय असल्याचाही उल्लेख युक्तिवादात करण्यात आला. दरम्यान, आरोपीच्या वकिलांनी परिवीक्षा अधिकाऱ्यांच्या अहवालावर आक्षेप घेतला असून, आरोपीने आपला बचाव लेखी स्वरूपात न्यायालयात सादर केला. या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकार पक्षाने केली आहे. मात्र, अंतिम शिक्षा काय असावी, याचा निर्णय न्यायालय देणार असून, त्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या वेळी सरकारी वकील ॲड. संजय सोनवणे, ॲड. स्नेहा शर्मा-ठाकरे आदी उपस्थित होते. चौकट पीडितेच्या वडिलांना न्यायालयात अश्रू अनावर खटला सुरू झाल्यापासून प्रत्येक सुनावणीला पीडितेचे वडील न्यायालयात उपस्थित राहत आहेत. बुधवारी न्यायालयाने त्यांना खटल्याबाबत काय वाटते, अशी विचारणा केली. त्या वेळी त्यांना अश्रू अनावर झाले. काही वेळ त्यांना बोलताही आले नाही. पाणी दिल्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मुलगी अजूनही ‘पप्पा’, ‘मम्मी’ अशी हाक मारत असल्याचा भास होत असल्याचे त्यांनी सांगितले. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी विनंती त्यांनी न्यायालयाकडे केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com