कुपोषणाची आकडेवारी जाहीर करून श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी

कुपोषणाची आकडेवारी जाहीर करून श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी
Published on: 
NSK26H35018 नंदुरबार : महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांना निवेदन देताना आदिवासी डॉक्टर असोसिएशनचे डॉ. राजेश वळवी व पदाधिकारी. --- कुपोषणावर श्वेतपत्रिका प्रसिद्ध करा धडगाव-अक्कलकुव्यातील समस्येवर ठोस उपाययोजनांची ‘माडा’ची मागणी सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. १५ : जिल्ह्यातील धडगाव- अक्कलकुवा या आदिवासीबहुल तालुक्यांत बालकुपोषणाची समस्या गंभीर आहे. गेल्या दहा वर्षांतील कुपोषणाची आकडेवारी जाहीर करून त्यावर श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी. बालकुपोषण रोखण्यासाठी आरोग्य आणि महिला व बालविकास विभागाने संयुक्तपणे ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर्स असोसिएशन (माडा) संघटनेने महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे, की, धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यांत बालकुपोषणाची समस्या अनेक वर्षांपासून कायम आहे. तीव्र कुपोषित आणि मध्यम तीव्र कुपोषित बालकांचे प्रमाण लक्षात घेता, मागील दहा वर्षांतील तालुकानिहाय व गावनिहाय आकडेवारी जनतेसमोर आणावी. कुपोषण निर्मूलनासाठी प्रत्येक अंगणवाडीत पायाभूत सुविधा, स्वयंपाकघर, खेळाचे मैदान आणि पूर्वप्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारावा. शासनाच्या नियमानुसार आठवड्यातून चार दिवस अंडी व केळी देण्याच्या पोषण आहार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी. बालविकास प्रकल्प अधिकारी आणि तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या नियमित संयुक्त बैठका घेणे, कुपोषणाचे सामाजिक लेखापरीक्षण करणे, तीव्र आणि मध्यम श्रेणीतील बालकांसाठी गावनिहाय विशेष कृती आराखडा तयार करून त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी ‘माडा’ने केली आहे. जिल्हास्तरावर संयुक्त कुपोषण नियंत्रण समिती स्थापन करून दरमहा आढावा घ्यावा. धडगाव आणि अक्कलकुवा या दुर्गम तालुक्यांसाठी विशेष निधी उपलब्ध करून स्वतंत्र कुपोषण निर्मूलन मोहीम राबवावी. बालकुपोषण हा आदिवासी भागातील भावी पिढीच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासाशी निगडित गंभीर विषय आहे. त्यामुळे या समस्येकडे शासनाने प्राधान्याने लक्ष देऊन कालबद्ध उपाययोजना कराव्यात, असेही निवेदनात म्हटले आहे. या वेळी महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश वळवी, संघटनेचे पदाधिकारी आणि डॉ. विजय पवार उपस्थित होते. --- चौकट कुपोषणमुक्तीसाठी ‘माडा’चा सक्रिय सहभाग शासनाच्या कुपोषण निर्मूलन मोहिमेत महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर्स असोसिएशन सक्रिय सहभाग घेण्यास तयार आहे. संघटनेतील डॉक्टरांच्या माध्यमातून वैद्यकीय मार्गदर्शन, बालकांची आरोग्य तपासणी, जनजागृती आणि कुपोषण नियंत्रण कार्यक्रमांसाठी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाहीही देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.