चिंचावड येथे
खूनाचा प्रयत्न
मालेगाव : जेसीबीने आमचा रस्ता का कोरला याचा जाब विचारात एकासह कुटुंबातील सदस्यांना टोळक्याने बेदम मारहाण केली. तसेच एका संशयिताने तक्रारदार यांचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. चिंचावड (ता. मालेगाव) येथील विनायक बापू चव्हाण (वय २९) यांच्या घराचा दरवाजा संशयित किरण सुभाष पाटील (आहिरे), मयूर सुभाष आहिरे, सुभाष काशिनाथ आहिरे, दोन अनोळखी (सर्व रा. चिंचावड) यांनी वाजवला. बापू चव्हाण यांनी दरवाजा उघडला असता, तुझ्या मुलाने सायंकाळी जेसीबीने आमचा रस्ता का कोरला असे सांगत घरात घुसून शिवीगाळ केली. त्यानंतर संशयित किरणने लोखंडी राॅडने विनायकच्या डोक्यावर मारून दुखापत केली. भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या बापूंना तसेच विनायकला मयुरने लाेखंडी रॉडने मारहाण केली. मदतीसाठी येणाऱ्या विनायकची आई व आजी-आजोबांना काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याला संपवूनच टाकू असे बोलून विनायकचा गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला. सोमवारी (ता.१६) रात्री ही घटना घडली.
------
कारमधून सोने,
रोकड लंपास
मालेगाव : चिखलओहोळ (ता. मालेगाव) येथील हॉटेल साईकारच्या पार्कींगमधील कारमधून चोरट्य़ांनी ४३ हजाराचा ऐवज लंपास केला. चोरट्य़ांनी कारमधील (एमएच १२ युएन ४६५३) ३ हजार रुपये रोख, ४० हजाराचे कानातील टॉप्स असा ४३ हजाराचा ऐवज व आधारकार्ड, पॅन कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, एटीएम कार्ड अशी कागदपत्रे चोरुन नेली. १६ नोव्हेंबरला रात्री दहा ते अकराच्या दरम्यान हा प्रकार घडला. कारचालक योगेश बापू जाधव (वय ३४, रा. काळे पडळ, पुणे) यांच्या तक्रारीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
------
दुचाकी अपघातात
एक जखमी; गुन्हा दाखल
मालेगाव :मुंबई-आग्रा महामार्गावरील चिखलओहोळ शिवारात दोन दुचाकींच्या अपघातात एक दुचाकीस्वार जखमी झाला. दीपक कारभारी घुमरे (वय ३०, रा. देवारपाडे) हा दुचाकीने (एमएच ४१ एके ५६९३) देवारपाडे येथून मालेगावकडे येत असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीने (एमएच ४१ एएफ २९४८) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात दीपक यांच्या डोक्याला, हाताला, पायाला, गुडघ्याला दुखापत झाली. १५ नोव्हेंबरला सकाळी अकराला हा अपघात झाला. तालुका पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.
------
डोंगराळेत टोल नाका
कर्मचाऱ्याला मारहाण
मालेगाव : डोंगराळे (ता. मालेगाव) येथील नरीसा सिवा गणेश कंपनी डोंगराळे टोल प्लाझा येथे नीलेश जगताप, मॉन्टी बैसाने, भटू जगताप (तिघे रा. करंजगव्हाण) व शेखर आहिरे (रा. लेंडाणे) यांनी त्यांची कार स्कॅनरचे पुढे नेली. येथील कर्मचारी दीपक मच्छिंद्र ह्याळीज (वय ३८, रा. डोंगराळे) यांनी त्यांना कार थोडी मागे घ्या असे सांगितले. याचा राग येऊन गाडी मागे घेणार नाही. गाडी येथेच स्कॅन करा असे बोलून संशयित यांनी दीपक यांना शिवीगाळ केली. तसेच धक्काबुक्की करून हाताच्या कड्याने डाव्या डोळ्यावर मारून दुखापत केली. १५ नोव्हेंबरला सायंकाळी सातला हा प्रकार घडला.