‘चित्रकथी रामायण’
प्रदर्शनास आजपासून प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १८ : जागतिक वारसा सप्ताहानिमित्त मविप्र उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालय आणि इंडिरून नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट ॲन्ड कल्चर हेरीटेज, नाशिक शाखा यांच्यातर्फे ‘चित्रकथी रामायण’ प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. गंगापूर रोडवरील उदाजी संग्रहालयात गुरुवारी (ता. १९) या विशेष प्रदर्शनाचा शुभारंभ होणार असून, बुधवार (ता.२५) पर्यंत सर्वांसाठी खुले असेल.
महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेतील चित्रकथी ही एक वैशिष्ट्यपूर्ण पारंपरिक कला आहे. चित्रांच्या माध्यमातून पौराणिक कथा, प्रसंग आणि व्यक्तिरेखा सादर करण्याची या कलेची अनोखी परंपरा आहे. रामायणातील विविध प्रसंग चित्रांच्या माध्यमातून उलगडणाऱ्या प्रदर्शनातून भारतीय संस्कृती, परंपरा आणि लोककलेचा समृद्ध वारसा अनुभवण्याची संधी रसिकांना मिळेल. आधुनिक डिजिटल युगात पारंपरिक लोककला आणि सांस्कृतिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हे प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरेल. जागतिक वारसा सप्ताहानिमित्त ऐतिहासिक वास्तू, कला, संस्कृती, परंपरा आणि ऐतिहासिक ठेव्यांचे जतन व संवर्धन करण्याबाबत जनजागृती करण्याचा उद्देशाने उदाजी संग्रहालयातर्फे विविध सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. प्रदर्शनाचे उद्घाटन मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली के. के. वाघ फाईन आर्ट महाविद्यालयाचे प्राचार्य बाळ नगरकर यांच्या हस्ते होणार आहे. हे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी खुले असून, प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.