खंडणीसाठी चॉपर हल्ला; दीड हजार लुटले
---
खान्देश मिल कॉम्प्लेक्स परिसरातील घटना; एक ताब्यात, दोघे फरार
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १३ : आनंद मेळा सुरू करण्यासाठी पैशांची मागणी करीत तिघांनी मेळा आयोजकासह एका तरुणाला खान्देश मिल कॉम्प्लेक्स परिसरात मारहाण केली. आयोजकावर चॉपरने वार करून त्याच्या खिशातील दीड हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. ही घटना गुरुवारी (ता. १२) रात्री घडली.
अरबाज शकील शेख (वय २६, रा. उस्मानिया पार्क) यांनी खान्देश मिल कॉम्प्लेक्स परिसरात आनंद मेळा भरविला आहे. गुरुवारी रात्री तीन जण मेळ्याच्या ठिकाणी आले. त्यांनी अरबाज शेख यांच्याशी वाद घालत पैशांची मागणी केली. वाद वाढल्यानंतर तिघांनी शेख यांना मारहाण केली व चॉपरने वार केले, तसेच त्यांच्या खिशातील दीड हजार जबरदस्तीने काढून घेतले. मोहंमद अनस खान खलील खान (रा. शाहूनगर) यांनी हस्तक्षेप केला असता, हल्लेखोरांनी त्यांनाही मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तिघांपैकी एका संशयिताला ताब्यात घेतले, तर अन्य दोघे घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.
याबाबत अरबाज शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा झाला आहे.