अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत ऑनलाइन सोने खरेदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gold

अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत ऑनलाइन सोने खरेदी

पंचवटी (जि. नाशिक) : ज्याचा कधी क्षय होत नाही, तो अक्षय या रूढ संकल्पनेला हिंदू धर्मीयांत मोठे महत्त्व आहे. त्यामुळे कोरोना संकटकाळातही शुक्रवारी (ता.१४) साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त असलेल्या दिवशी ऑनलाइन सोने खरेदीला प्राधान्य देत मनमुराद आंब्याच्या रसाचाही घरोघरी आस्वाद घेण्यात आला. दरम्यान, घरोघरी पारंपरिक पद्धतीने कऱ्हा- केळीचे पूजन करण्यात आले. (Citizens prefer to buy gold online on the occasion of Akshay Tritiya)


साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेला सोन्याबरोबर गृह, वाहन खरेदीला ग्राहकांची प्रथम पसंती असते. एकीकडे कोरोनाचे संकट गडद होत असताना कडकडीत बंदचा पर्याय प्रशासनाने निवडला आहे. त्यामुळे एरवी अक्षयतृतीया म्हटल्यावर सोन्यासह गृह, वाहने खरेदीला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद बंदमुळे जाणवला नाही. दरम्यान, शहरासह विविध उपनगरांत गृहिणींनी कऱ्हा-केळीचे पूजन करीत यानिमित्ताने आपल्या पूर्वजांचेही स्मरण केले. अनेक ठिकाणी आमरस- पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला.

हेही वाचा: नाशिकमध्ये 'रेमडेसिव्हिर'चा काळाबाजार; मेडिकल बॉयसह 3 नर्स ताब्यात


सलग दुसऱ्या वर्षी व्यापारीपेठा बंद
लागोपाठ दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे व्यापारीपेठा बंदच राहिल्या. त्यामुळे अनेकांना नियोजन करूनही वाहन, घर खरेदीपासून दूर राहावे लागले. यादरम्यान अनेक सराफी व्यावसायिकांनी ग्राहकांना ऑनलाइन खरेदीची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे पेढ्या बंद असल्यातरी ग्राहकांनी सोन्याच्या ऑनलाइन खरेदीला प्राधान्य दिले. यंदा साठ टक्के व्यवसाय झाल्याचे सराफ असोसिएशनचे माजी अध्यक्ष चेतन राजापूरकर यांनी सांगितले. आज दहा ग्रॅम सोन्यासाठी ४८ हजार दोनशे असा दर होता. ऑनलाइन व्यवहारात ज्या ग्राहकांना आजच घरी सोने हवे होते, त्यांनी मागणी नोंदविताच ते घरपोच देण्यात आले.


सुगड्याला मागणी
पूजेसाठी लागणारे कऱ्हा, केळी यांना बाजारात मोठी मागणी होती. रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, भडक दरवाजा, शनिचौक, भद्रकाली आदी भागात हे विक्रेते मोठ्या संख्येने दाखल झाले होते. या वस्तू बाजारात दहा ते पंधरा रुपयांत उपलब्ध होत्या.
आपल्याकडे साडेतीन मुहूर्तांवरील खरेदीला मोठे महत्त्व आहे. सध्या कोरोनामुळे सर्वच व्यवसाय बंद असल्याने या वर्षी प्रथमच सोने खरेदीसाठी ऑनलाइन खरेदीचा मुहूर्त साधला.
- स्नेहा देवरे, ग्राहक

(Citizens prefer to buy gold online on the occasion of Akshay Tritiya)

हेही वाचा: कोरोना उतरणीला मात्र इभ्रत टांगणीला! नाशिक मार्केट गर्दीचे फोटो देशभर VIRAL

Web Title: Citizens Prefer To Buy Gold Online On The Occasion Of Akshay

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..