esakal | नाशिककरांचे स्वप्न आजपासून प्रत्यक्षात! शहर बस वाहतूक सेवा सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

city bus command center

नाशिककरांचे स्वप्न आजपासून प्रत्यक्षात! शहर बस वाहतूक सेवा सुरू

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : मुंबई, पुणे, ठाणे या महानगरांप्रमाणेच नाशिक शहरातदेखील शहर बस वाहतूक सेवा (nashik city bus service) सुरू होण्याचे नाशिककरांचे स्वप्न गुरुवार (ता. ८)पासून प्रत्यक्षात येणार आहे. शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या शहर बससेवेमुळे शहरासह आजूबाजूच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. त्याचबरोबर प्रदूषण, पार्किंग यांसारख्या समस्या सुटण्यास मदत होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिककर बससेवेची वाट पाहत होते, ती सेवा गुरुवारपासून नाशिककरांच्या सेवेत दाखल होत आहे.(City-bus-service-started-in-Nashik-city-marathi-news)

शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था होणार बळकट

सेवेबद्दल माहिती देताना आयुक्त कैलास जाधव म्हणाले, की सेवा सुरू करताना जलद व कार्यक्षम शहर निर्माण करणे, रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याबरोबरच शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक विकास करण्याचा उद्देश आहे. खासगी वाहनांचा कमीत कमी वापर करून प्रदूषणमुक्तीसाठी सीएनजी बस चालविल्या जाणार आहेत. तपोवन, निमाणी, सीबीएस, नाशिक रोड, भगूर बसस्थानकावरून बस सुटतील. तपोवन आगारातून ३२, तर नाशिक रोड आगारातून ३१ मार्गांवर बस सुरू केल्या जाणार आहेत. बससेवेत इंटेलिजन्स ट्रान्स्पोर्ट मॅनेजमेंट सिस्टिमचा वापर होणार असून, ही प्रणाली कमांड कंट्रोल सेंटरला जोडण्यात आल्याने त्याद्वारे बसवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. प्रवाशांना वेळापत्रक, इलेक्ट्रॉनिक्स तिकिटिंग, मार्गाचे किलोमीटर, प्रवासास लागणाऱ्या वेळेची माहिती या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. बससेवेमध्ये ऑटोमॅटिक व्हेइकल लोकेशन प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. याद्वारे बसचा मार्ग, वेळ, स्थळ, शेवटचे स्थळ, बस वेळेवर न येणे, थांब्यावर न थांबणे, चालकाची वर्तणूक आदींची माहिती या प्रणालीद्वारे इंटरनेटद्वारे कमांड कंट्रोल सेंटरला मिळणार आहे. पाच टप्प्यांमध्ये बससेवा सुरू केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात नऊ मार्गांवर ४६ बस, दुसऱ्या टप्प्यात नऊ मार्गांवर ४९, तिसऱ्या टप्प्यात १३ मार्गांवर ५०, चौथ्या टप्प्यात १६ मार्गांवर ४८, तर पाचव्या टप्प्यात १६ मार्गांवर ४८ अशा एकूण २४१ बस चालविल्या जाणार आहेत.

मोबाईल अॅपवर मिळणार माहिती

मोबाईलमध्ये सिटीलिंक नावाने अॅप्लिकेशन उपलब्ध करून देण्यात आले आहे. अॅप्लिकेशनमध्ये वेअर ॲम आय, बस रूट, बुक माय तिकीट, व्ह्यू तिकीट, माय पास, माय फिव्हरिट्स, फीडबॅक, हेल्पलाइन आदी मॉड्यूल्स उपलब्ध आहेत. या माध्यमातून प्रवासी कुठे आहे, मार्गावरील बसची माहिती आदी सुविधा मिळणार आहे. प्रवाशासाठी https://citilinc.nmc.gov.in वेबसाइट उपलब्ध करून देण्यात आली आहे. citilinc.nmc.gov.in संकेतस्थळावरून बस मार्ग व वेळापत्रकाबद्दल माहिती मिळणार आहे.

हेही वाचा: इगतपुरी रेव्ह पार्टीतील संशयितांना न्यायालयीन कोठडी

शहर बससेवेची वैशिष्ट्ये

-शहरापासून वीस किलोमीटर क्षेत्रापर्यंत बस पोचणार.

-शहरात १,३९२ बस थांबे, १६१ प्रवासी निवारा शेड.

-२५२ प्रवासी शेड नव्याने बांधणार.

-९७९ बसथांब्यावर पोल.

-जीपीएस यंत्रणेद्वारे बसवर नियंत्रण.

-बसमध्ये थांब्याची उद्‌घोषणा होणार.

-बसमध्ये इलेक्ट्रॉनिक रूट बोर्ड.

-बसचालकाच्या हालचालींवर नियंत्रण.

-पब्लिक इन्फर्मेशन सिस्टिमद्वारे अचूक नियोजन.

-प्रवाशांचा वेळ वाचणार.

-बसच्या रिअल टायमिंगसाठी टॅब.

-प्रवाशांच्या सोयीसाठी हेल्पलाइन क्रमांक ७७०९९७३३०७.

पहिल्या टप्प्यात नऊ मार्गांवर बससेवा

-तपोवन ते बारदान फाटा

-तपोवन ते सिम्बायोसिस कॉलेज

-तपोवन ते पाथर्डी गाव

-सिम्बॉयसिस ते बोरगड

-तपोवन ते भगूर

-नाशिक रोड ते बारदान फाटा

-नाशिक रोड ते अंबड गाव

-नाशिक रोड ते निमाणी

-नाशिक रोड ते तपोवन

-पाच स्थानकांवर बस स्कॅन होणार

-सोळा पथकांद्वारे तपासणी

-विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना ३५४ रुपये दंड

हेही वाचा: जिल्हा परिषद सदस्या ते केंद्रीय मंत्री; भारती पवार यांचा प्रवास

सुरक्षित प्रवास, शाश्वत, कार्यक्षम, विश्वासार्ह, प्रदूषणमुक्त, सुलभ वाहतूक सेवा पुरविण्यास सिटीलिंक कटिबद्ध आहे. बससेवेच्या माध्यमातून शहराच्या वर्तमान व भविष्यातील वाहतुकीची आवश्यकता पूर्ण करण्याचे ध्येय आहे. -कैलास जाधव, आयुक्त, महापालिका

वाढत्या शहराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करण्याचा आनंद होत आहे. -सतीश कुलकर्णी, महापौर

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी देण्याबरोबरच पर्यावरण समतोल व आर्थिक विकास या माध्यमातून होणार आहे. नाशिककरांनी खासगी वाहने न वापरता बससेवेचा लाभ घ्यावा. -गणेश गिते, सभापती, स्थायी समिती

मास पब्लिक ट्रान्स्पोर्ट शहराची गरज आहे. यामुळे वाहतूक कमी होऊन प्रदूषण कमी होईल. कुठलाही प्रकल्प चांगलाच असतो. फक्त अंमलबजावणी महत्त्वाची आहे. बससेवेची घंटागाडी होऊ नये हीच अपेक्षा. -अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेते

loading image