शहर अभियंतापदाची लवकरच खांदेपालट?
आर. टी. पाटील यांच्याकडे कायमस्वरूपी जबाबदारी देण्याची तयारी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ५ : जळगाव महापालिकेतील महत्त्वाच्या शहर अभियंतापदावर लवकरच नवा चेहरा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सध्या शहर अभियंतापदाची जबाबदारी योगेश बोरोले यांच्याकडे असली, तरी ते रजेवर असल्याने प्रशासनाने या पदाच्या कामकाजात तात्पुरता बदल केला आहे. आता प्रभारी व्यवस्थेऐवजी शहर अभियंतापदाचा कायमस्वरूपी कार्यभार अभियंता आर. टी. पाटील यांच्याकडे सोपविण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू असल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली.
बोरोले रजेवर गेल्यानंतर दोन दिवसांपूर्वी शहर अभियंतापदाचा प्रभारी कार्यभार अभियंता योगेश वाणी यांच्याकडे सोपविण्यात आला होता. मात्र, महापालिका प्रशासनाने पदाची जबाबदारी निश्चित करण्याच्या दृष्टीने पुढील हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार आर.टी.पाटील यांच्याकडे शहर अभियंतापदाचा कायमस्वरूपी कार्यभार देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबतचे अधिकृत आदेश लवकरच जारी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, योगेश बोरोंले रजेवरून परतल्यानंतर त्यांच्याकडे महापालिकेतील अन्य जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्या नव्या पदभाराकडेही लक्ष लागले आहे.
चौकट
रिक्त पदासांठी शासनाकडे पाठपुरावा
महापालिकेतील प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी रिक्त पदे भरण्याची प्रक्रियाही सुरू होणार आहे. उपायुक्त, सहायक आयुक्त यांच्यासह इतर रिक्त पदांवर अधिकारी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव व पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. महापालिकेतील महत्त्वाची पदे भरल्यास विविध विकासकामे आणि प्रशासकीय निर्णयांच्या अंमलबजावणीला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.