सेकंडमेन
शहर टुडे पान तीनसाठी आजच आवश्यक
-----------
वृत्तमालिका : नव्या वस्त्या.. जुन्या समस्या
----
NSK26H31951
जळगाव : रस्त्यालगत नाल्यात साचलेला कचरा.
NSK26H31952 : बंद पथदीप.
NSK26H31953 : तुंबलेली गटार.
NSK26H31954 : खुल्या भुखंडावर वाढलेले गवत.
(सर्व छायाचित्रे : संधिपाल वानखेडे)
-----------------
गटारी तुंबल्या, रस्ते गायब; पथदिवेही बंद!
-----
हरीओमनगर, लक्ष्मीनगरपर्यंत नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ११ : शहरातील वाढीव वस्त्यांत नागरी सुविधांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. के. सी. पार्क रोड परिसरातील हरी ओमनगर, दत्तात्रयनगर, सिद्धिविनायक पार्क, नगरसिटी कॉलनी व लक्ष्मीनगर या भागांत गटारींची नियमित साफसफाई होत नसल्याने अस्वच्छता पसरली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था आहे. काही भागांत पक्के रस्तेच नसल्याने नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच पथदिवे बंद असल्याने रात्री अंधाराचा सामना करावा लागतो. वारंवार तक्रारी करूनही प्रश्न सुटत नसल्याने नागरिकांत नाराजी वाढत आहे.
अस्वच्छतेमुळे आरोग्याचा प्रश्न
या भागात गटारींची नियमित साफसफाई होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. गटारींत साचलेला कचरा व सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी येण्याची शक्यता आहे. डासांची उत्पत्ती वाढल्यास डेंगी, मलेरियासारख्या आजारांचा धोका आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वच्छतेकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
रस्त्यांअभावी गैरसोय
नगरसिटी कॉलनी व लक्ष्मीनगरसह इतर वाढीव वस्त्यांत रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही ठिकाणी पक्के रस्ते नसल्याने पावसाळ्यात चिखल व साचलेल्या पाण्यामुळे अडचणी वाढतात. दुचाकीस्वार, पादचारी, ज्येष्ठ नागरिक व मुलांना विशेष त्रास होतो. रस्त्यांची कामे कधी होणार, असा प्रश्न रहिवासी विचारत आहेत.
रात्री पथदिवे बंदच
परिसरातील काही ठिकाणी पथदिवे बंद असल्याने रात्री रस्त्यांवर अंधार पसरतो. रस्त्यांची दुरवस्था व अपुरी प्रकाशव्यवस्थेमुळे ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः महिला, विद्यार्थी व कामावरून उशिरा घरी परतणाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. म्हणून पथदिवे तातडीने सुरू करण्याची गरज आहे.
तक्रारी करुनही उपयोग नाही
नागरी समस्यांबाबत संबंधित नगरसेवकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, फोन उचलले जात नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. काही वेळा संपर्क झाल्यानंतरही उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याची भावना रहिवाशांनी व्यक्त केली. त्यामुळे समस्या कोणाकडे मांडायच्या व निराकरण कधी होणार, असा प्रश्न आहे.
खुल्या भूखंडांचा प्रश्न
वाढीव वस्त्यांत मोकळ्या जागेचा प्रश्नही महत्त्वाचा आहे. नागरिकांना विरंगुळ्यासाठी, मुलांना खेळण्यासाठी व सार्वजनिक उपयोगासाठी योग्य जागा आवश्यक आहे. मात्र, खुले भूखंड मंजूर नसल्याची तक्रार नागरिकांची आहे. संबंधित जागांच्या विकास आराखड्यातील तरतुदी, आरक्षण व मंजुरीची सद्यस्थिती महापालिकेने स्पष्ट करावी, अशी अपेक्षा आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष?
शहरविस्तारासोबत नव्या वस्त्यांतील लोकसंख्याही वाढत आहे. मात्र, त्या तुलनेत रस्ते, गटारी, पथदिवे व स्वच्छता आदी सुविधा मिळत नसल्याची तक्रार पुढे येत आहे. घरपट्टी व इतर कर भरणाऱ्यांना मूलभूत सुविधा कधी मिळणार, असा प्रश्न आहे.
महापालिकेने परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून स्थिती स्पष्ट करीत संबंधित कामांसाठी कालबद्ध कृतिआराखडा तयार करण्याची मागणी होत आहे.
----
कोट
गटारींची साफसफाई नाही, रस्त्यांची समस्या कायम व अनेक पथदिवे बंद आहेत. तक्रारी करूनही प्रश्न सुटत नसतील, तर दाद मागायची कुणाकडे? नगरसेवकांशी संपर्क साधला तरी फोन उचलले जात नाहीत.
- योगेश खर्चाने, रहिवासी.