टूडे साठी
----------
सिटीलिंक बससेवा होणार अधिक शिस्तबद्ध
चालक-वाहकांसाठी ‘टाटा स्ट्राइव्ह’चे प्रशिक्षण सत्र
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २८ : प्रवाशांशी अरेरावी आणि मुजोर वर्तनाच्या तक्रारींनंतर जाग आलेल्या सिटीलिंक कंपनी व्यवस्थापनाने चालक आणि वाहकांना आता शिस्त लावण्यासाठी पावले उचलण्यात आली आहे. सिटीलिंक व्यवस्थापनाने कौशल्य विकास क्षेत्रातील प्रतिष्ठित संस्था टाटा स्ट्राइव्हच्या माध्यमातून दिवाळीनंतर विशेष प्रशिक्षण उपक्रम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेमार्फत शहरात सिटीलिंक बससेवा सुरू करण्यात आली असली तरी चालक- वाहकांच्या वर्तणुकीबाबत प्रवाशांच्या सातत्याने तक्रारी येत आहेत. त्याचा परिणाम सिटीलिंकच्या प्रतिमेवर होत असल्याने दर्जेदार, सुरक्षित आणि शिस्तबद्ध सेवा देण्यासाठी हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या उपक्रमांतर्गत दर रविवारी आठ तासांचे प्रशिक्षण सत्र होणार असून प्रत्येक सत्रात ५० चालक-वाहकांना प्रशिक्षण दिले जाईल. राष्ट्रपती भवन, संसद भवन, पंतप्रधान कार्यालय, राज्यपाल भवन, नौदल आणि हवाई दलातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या टाटा स्ट्राइव्ह संस्थेची यासाठी निवड करण्यात आली आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना संस्थेकडून प्रमाणपत्र दिले जाणार आहे.प्रवाशांशी प्रभावी संवाद, सेवा गुणवत्ता, व्यावसायिक शिस्त, जबाबदारीची जाणीव, व्यक्तिमत्त्व विकास आणि दैनंदिन कौशल्यवृद्धी या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. या उपक्रमामुळे बससेवा अधिक प्रवासी केंद्री होऊन कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे.
------------------