Nashik : ‘सिटी लिंक’ च्या चालक- वाहकाला मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nashik

‘सिटी लिंक’ च्या चालक- वाहकाला मारहाण

म्हसरूळ : महापालिकेच्या सिटी लिंक या शहर बसमध्ये घुसून महिलेसह तिच्या साथीदारांनी वाहकासह चालकाला जबर मारहाण केली. ही घटना शनिवारी (ता. १३) घडली. सदरचा संपूर्ण प्रकार बसच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून म्हसरूळ पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मनपाची नव्याने सुरु झालेली सिटी लिंक ही शहर बस सेवा सध्या चांगले उत्पन्न मिळवत आहे. मात्र काही संशयित नव्या बसेस लक्ष करत आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी सातपूर येथे एका नव्या बसची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा शनिवारी म्हसरुळच्या बोरगड परिसरातील कणसरा माता चौकात पुनरावृत्ती झाली. बस (क्रमांक एम एच १५ जी व्ही ७८७०; ११०) चा चालक गोकूळ काकड, वाहक अक्षय गवारे हे नाशिक रोडहून बोरगडकडे जात होते. ‘आमच्या गाडीला ओव्हरटेक का केले, आमच्या गाडीला धक्का लागला’ याचा जाब विचारत टाटा मानझा औरा चारचाकी (क्रमांक एम एच ०२ बी आर ९४८५) तील संशयित महिला आणि तिच्या साथीदारांनी बस अडवली. तसेच बसमध्ये घुसून चालकाशी वाद घालून मारहाण केली. वाहक समजावत असताना त्यालाही मारहाण करण्यात आली.

मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून म्हसरूळ पोलिस ठाण्यात अनोळखी महिला आणि तिच्या साथीदारांविरोधात तक्रार दाखल झाली आहे. तसेच सिटी लिंक बस कंपनीकडून देखील कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

बस चालक व वाहकांवर उपचार

बस चालक व वाहक यांचे म्हणणे असे आहे की, बसचा नाशिक रोड ते बोरगड असा रूट होता. बोरगड येथील कणसरा माता चौकात बस जात असताना त्यांना एक वाहन आडवे आले. सदर वाहन चालक- मालक यास बाजूला घेण्यास सांगितले. परतू यावर वाहन चालक यांनी अरेरावी करत आमच्या वाहनास धक्का लागल्यास तुम्हाला मारहाण करू, तुमची बस पेटवून देऊ, अशी अरेरावी केली. आमच्या गाडीला ओव्हरटेक का केले असे म्हणत बसमध्ये घुसून महिलेसह चार ते पाच साथीदारांनी मारहाण केली. सदर प्रकार सीसीटीव्ही कैद झाला आहे. बस चालक व वाहक हे शासकीय रूग्णालयात उपचार घेत आहेत. नाशिक शहरात असे प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी पोलिस प्रशासन काय कठोर पाऊल उचलते याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

loading image
go to top