ॲंकर
फोटोची जागा सोडावी
---
पणत्यांना चाकावर आकार, भट्टीतून मिळतो साज
दीपोत्सवासाठी कारागिरांची लगबग; मागणीत वाढ होण्याच्या अपेक्षा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २२ : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरासह परिसरात मातीच्या पणत्या बनविण्याच्या कामाला वेग आला आहे. दिवाळीत घराघरांत पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्याची परंपरा असल्याने पणत्या तयार करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.
माती गोळा करणे, ती मळणे, चाकावर पणत्या घडविणे, त्या वाळविणे आणि भट्टीत भाजून तयार करणे, अशा विविध टप्प्यांतून पणत्या तयार होत आहेत. सणाच्या पार्श्वभूमीवर वेळेत अधिकाधिक पणत्या तयार करण्यासाठी कारागीर देखील कामाला लागले आहेत.
पणत्या बनविण्याची प्रक्रिया मेहनतीची आणि कौशल्याची आहे. सर्वप्रथम पणत्या बनविण्यासाठी योग्य माती निवडून ती मळली जाते. त्यानंतर कारागीर चाकावर मातीला आकार देऊन विविध आकारांच्या पणत्या तयार केल्या जातात. तयार पणत्या व्यवस्थित वाळविणे आवश्यक असते. त्यानंतर त्या भट्टीत भाजल्या जातात. या प्रक्रियेनंतर पणत्या विक्रीसाठी तयार होतात. काही पणत्यांना रंगकाम करून आकर्षक स्वरूपही दिले जाते.
बाजारपेठ हवी
पणत्या तयार करण्यासाठी लागणारा वेळ, मेहनत, मातीची उपलब्धता, इंधनाचा खर्च आणि वाहतूक यांसारख्या बाबींचाही विचार करावा लागतो. हवामानातील बदलामुळे पणत्या वाळविण्याच्या प्रक्रियेवर परिणाम झाल्यास उत्पादनाच्या वेळापत्रकात बदल करावा लागतो. या व्यवसायातून दिवाळीच्या काळात अनेक कुटुंबांना रोजगार मिळतो. त्यामुळे स्थानिक कारागिरांकडून पणत्या खरेदी केल्यास त्यांच्या पारंपरिक व्यवसायाला हातभार लागतो.
कोट
माती आणण्यापासून पणत्या तयार करून त्या वाळविणे आणि भाजण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यात मेहनत घ्यावी लागते. कुटुंबातील सर्व सदस्य मिळून पणत्या तयार करीत आहोत. दिवाळीत मातीच्या पणत्यांना चांगली मागणी मिळेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, वाढता कच्च्या मालाचा आणि इंधनाचा खर्च पाहता पणत्यांना योग्य दर मिळणे गरजेचे आहे.
- कुंदन कुंभार, स्थानिक कारागीर