स्वच्छ, कचरामुक्त ओझरसाठी समन्वयाने काम करा!
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे सफाई कर्मचाऱ्यांना आवाहन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१४ : स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त ओझर शहराच्या निर्मितीसाठी सफाई कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे. शहराचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व जपत ‘आमचे ओझर–आमचे तीर्थक्षेत्र’ ही संकल्पना साकार करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (ता. १४) सेवा संकल्प अभियानांतर्गत ओझर नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. शहरातील स्वच्छता कायम राखणे आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या. तसेच प्रधानमंत्री आवास व रमाई आवास योजनांचा लाभ घेणे, आयुष्मान भारत कार्ड काढणे, किमान वेतनासंबंधी तरतुदींची माहिती घेणे आणि नियमित आरोग्य तपासणी करणे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
कार्यक्रमास नगरपालिका शाखेचे सहआयुक्त श्याम गोसावी, उपायुक्त स्नेहल विसपुते, ओझरचे मुख्याधिकारी किरण देशमुख, पाणीपुरवठा अभियंता राहूल शिंदे आणि स्वच्छता निरीक्षक गणेश महाजन उपस्थित होते. यावेळी ३१ सफाई कर्मचाऱ्यांना गणवेश प्रदान करण्यात आले.
फोटो क्रमांक :- एच-32410