फोटो : B12917
सिडको : विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे यांना निवेदन देताना चेतन फेगडे, सुभाष आल्टे, बी. पी. गडाख, प्रमोद गायकवाड आदी
--
पाथर्डी फाटा परिसरात
गटाराचे पाणी रस्त्यावर
इंदिरानगर, ता. १४ : आनंदनगर भागात रस्त्यावर वाहणाऱ्या दुर्गंधीयुक्त सांडपाणी तातडीने रोखण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी सिडको विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
येथील पाण्याच्या टाकीमागे, शिवगंगा हिल्स व गोविंद बिल्डिंगसमोरील गटाराच्या चेंबरमधून गेल्या दोन- तीन महिन्यांपासून वारंवार सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. सहा- सात दिवसांपासून सर्वदूर हे सांडपाणी वाहत असल्याने दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मलनिस्सारण विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही कायमस्वरूपी उपाय होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. कर्मचारी तात्पुरती साफसफाई करतात; मात्र काही वेळाने पुन्हा सांडपाणी वाहू लागते. नवीन पाइपलाइन टाकल्यानंतरच समस्या सुटेल, असे कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात असल्याचे नागरिकांनी नमूद केले.
उपअभियंता हेमंत पठे यांनी घटनास्थळी पाहणी करावी, अशी मागणी करण्यात आली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष चेतन फेगडे, प्रगती फेगडे, सुभाष आल्टे, बी. पी. गडाख, प्रमोद गायकवाड, चेतन पाटील, विनोद भदाणे, माधुरी भंगाळे, अरुण देसले आदी उपस्थित होते.