फोटो- 03106
नाशिक ः स्वच्छता योद्ध्यांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद.
सुरगाण्यातील सफाई कर्मचाऱ्यांनी
साधला जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद
सुरगाणा, ता. ५ ः येथील नगर पंचायतीत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविलेल्या सेवा अभियान राबविण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान, त्यांच्या समस्या जाणून घेणे तसेच त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे या उपक्रमांतर्गत ‘सफाई मित्र सुरक्षा व सन्मान शिबिर’ आयोजित करणे, नगर परिषद व नगरपंचायतीमध्ये कार्यरत सफाई कर्मचारी अर्थात, ‘स्वच्छता योद्ध्यांशी’ त्यांच्या दैनंदिन कामकाजातील अडचणी, समस्या व त्यावरील उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला. या वेळी नगरपंचायतीच्या १२ सफाई कर्मचारी व स्वच्छता योद्ध्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष संवाद साधत समस्या समजून घेतल्या. नगरविकास शाखेचे सहआयुक्त श्याम गोसावी उपस्थित होते.
स्वच्छता योद्ध्यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गणवेशाचे वाटप करण्यात आले. सफाई कर्मचाऱ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती देत त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. सफाई कर्मचाऱ्यांनी आरोग्याची नियमित तपासणी करून घेणे तसेच उपलब्ध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी सुरगाणा शहर कचरामुक्त करण्यासाठी नियोजन करून काम करण्याचे मार्गदर्शन केले. स्वच्छता मोहीम अधिक व्यापक करताना सुरगाणा शहराची ओळख ‘स्वच्छ सुरगाणा सुंदर सुरगाणा पर्यावरणपूरक सुरगाणा’ अशी निर्माण करण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी व स्वच्छता योद्ध्यांनी एकजुटीने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले. नगराध्यक्ष भरत वाघमारे, मुख्याधिकारी सुभाष जानोरे, लेखापाल निशांत नागरे, विजय गोयल, शहर समन्वयक सम्यक बागूल, प्रशांत ढिकले आदी उपस्थित होते.