धुळे : मुख्य अंकातील पानासाठी....
--
चाळीस हजार विद्यार्थ्यांचा स्वच्छतेचा धडा!
--
सेवा संकल्प अभियानातून जिल्ह्यात स्वच्छता मोहीम
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १५ : स्वच्छतेचे महत्त्व केवळ पुस्तकातून न शिकता प्रत्यक्ष कृतीतून अनुभवण्याची संधी जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना मिळाली. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील शासकीय, अनुदानित, नामांकित व एकलव्य आश्रमशाळा, वसतिगृहांमध्ये व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या पुढाकारातून राबवलेल्या या मोहिमेत ४० हजारांहून अधिक विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.
-
शाळा आणि वसतिगृहांचा परिसर स्वच्छ करण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी सवयी निर्माण करण्यावर या उपक्रमात विशेष भर देण्यात आला. स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरणात विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. मोहिमेदरम्यान शाळांचे परिसर, वर्गखोल्या, वसतिगृहे, स्वयंपाकगृहे, भोजनगृहे, स्वच्छतागृहे आणि स्नानगृहांची स्वच्छता करण्यात आली. साचलेल्या कचऱ्याचे संकलन करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. तसेच, अनावश्यक वस्तू हटवून शाळा व वसतिगृहांचा परिसर अधिक स्वच्छ आणि नीटनेटका करण्यात आला.
-
‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा आणि निरोगी विद्यार्थी’ हा संदेश देत विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमात भाग घेतला. शाळा आणि वसतिगृह स्वच्छ ठेवणे ही केवळ कर्मचाऱ्यांची जबाबदारी नसून प्रत्येक विद्यार्थ्याचाही त्यात सहभाग महत्त्वाचा आहे, याची जाणीव या उपक्रमातून करून देण्यात आली. स्वच्छता ही एका दिवसापुरती मोहीम न राहता दैनंदिन जीवनाचा भाग बनावी, यासाठी जनजागृती करण्यात आली. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबवण्यात आली.