वडगाव सिन्नर शिवारात ढगफुटीसदृश पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

soil flowed due to cloudburst rain

वडगाव सिन्नर शिवारात ढगफुटीसदृश पाऊस

सिन्नर (जि. नाशिक) : तालुक्यातील वडगाव सिन्नर शिवारात शुक्रवारी (ता. २४) सायंकाळी ढगफुटी (Cloud Burst) सदृश पावसामुळे (Rain) जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले. जयप्रकाशनगर (कंदोरी) व वडगाव-सिन्नर या गावांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले. या पावसाने गावातील नदी-नाले दुथडी वाहत होते. (Cloud burst rain in Wadgaon Sinnar Area Nashik Monsoon News)

मोठा पाऊस झाल्याने काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले, तर काही पिकांना फ्टका बसलाय. पावसाने नागरिकांची धांदल उडाली. अनेक शेतातील माती वाहून गेल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.

यात अनेकांची शेतात पाणी साचून शेतातील बांध फुटले. अनेकांची शेतातील माती वाहून गेली. पावसाच्या पाण्याने ओढे-नाले एक झाले. जिकडे-तिकडे पाणीच पाणी झाले. या पावसाने वडगाव-सिन्नर शिवारातील गट नंबर ५०३ व चंद्रभान कडभाने यांच्या गट नंबर ५०४ या क्षेत्रात मोठे नुकसान झाले. रवींद्र कडभाने यांच्या क्षेत्रातून सुमारे २५ गुंठे भागातील माती वाहून गेली. त्याचबरोबर चंद्रभान कडभाने यांच्या क्षेत्रातीलही माती वाहून गेली. तलाठी श्रीमती पाटील व कृषीसेवक भगत यांनी पंचनामा केला. या शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली.

कही खुशी कही गम

काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने अनेक ठिकाणी पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. त्यातच काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत तसेच काही ठिकाणी पेरणीयोग्यसुद्धा पाऊस न झाल्याने शेतकरीराजा पावसाची वाट पाहत आहे. ‘कही खुशी- कही गम’ असाच काहीसा प्रकार तालुक्यात बघण्यास मिळत आहे.