अमरनाथमध्ये ढगफुटी : नांदगावचे 200 भाविक सुरक्षित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amarnath Yatra

अमरनाथमध्ये ढगफुटी : नांदगावचे 200 भाविक सुरक्षित

नांदगाव (जि. नाशिक) : जम्मू- काश्‍मिरमधील अमरनाथ गुहेजवळ शुक्रवारी (ता. ८) सायंकाळी साडेपाचला झालेल्या ढगफुटीमुळे बाबा अमरनाथच्या यात्रेला गेलेले सर्वच्या सर्व दोनशे नांदगावकर यात्रेकरू सुरक्षित असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष राजेश कवडे व ज्येष्ठ पत्रकार विजय चोपडा यांनी ‘सकाळ’ला दिली. तर चांदवड तालुक्यातील वडनेरभैरव येथील ३९ भाविक सुखरूप असून, ते ४० किलोमीटर अंतर पोचले आहेत. (latest marathi news)

आकाशात अचानक वीज चमकली व अमरनाथ पवर्तावर ढगफुटी झाल्याने यात्रेकरूंमध्ये खळबळ उडाली. ढगफुटीनंतर मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले. ढगफुटी पर्वतावर झाली असली तरी नांदगावचे भाविक पर्वताच्या पायथ्याशी सुरक्षित असून, त्यांच्यासह सर्वांना रोखून धरण्यात आले आहे. हे सर्व भाविक गुरुवारी (ता. ७) अमरनाथ गुहेजवळ पोहचणार होते. मात्र, खराब हवामानामुळे पहलगाम आणि बालटालमध्ये बाबा अमरनाथ यात्रा थांबविण्यात आली होती. कदाचित गुरुवारी रात्री नांदगावकर भाविक अमरनाथला पोचले असते, तर या कल्पनेने भाविकांच्या काळजाचा ठोका चुकला. पावसाचा गारवा लक्षात घेता प्रशासनाने यात्रा दिवसभरासाठी पुढे ढकलली आहे. (Cloudburst in Amarnath)

हेही वाचा: "शिवसेनेत आता फक्त दोनच माणसं राहणार"; दानवेंची घणाघाती टीका

नांदगावचे माजी नगराध्यक्ष राजेश कवडे पंधरा वर्षांपासून दरवर्षी बाबा अमरनाथ यात्रेचे आयोजन करीत असतात. त्यांच्या नेतृत्वाखाली दोनशेहून अधिक शहरातील भाविक जूनमध्ये अमरनाथला रवाना होतात. त्यामुळे आज सायंकाळी अमरनाथच्या ढगफुटीचे वृत्त कळताच शहरवासीय काळजीत पडले होते. खराब वातावरण व मोबाईल रेंज तुटत असल्याने काही समजत नव्हते. परंतु, श्री. कवडे यांनी फोन करून शहरातील भाविक सुखरूप असल्याचे कळविताच सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. बालटालच्या वाटेवर आयटीबीपी आणि एनडीआरएफची टीमही येथे तैनात करण्यात आली असून, हेल्पलाइनही जारी करण्यात येणार आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आयटीबीपीचे पथक मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत.

चौधरी यात्रा कंपनीकडून संवादाची क्लिप जारी

अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाल्याने यात्रेकरूंविषयी काळजीचा सूर आळवला गेला. ढगफुटीची घटना समजताच, चौधरी यात्रा कंपनीचे संचालक रामगोपाल चौधरी यांनी अमरनाथ यात्रेसाठी यात्रेकरूंना घेऊन गेलेल्या व्यवस्थापकांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. त्यानंतर श्री. चौधरी यांनी कंपनीतर्फे गेलेले सर्व यात्रेकरू सुखरूप असल्याची माहिती दिली. कंपनीचे व्यवस्थापक बालटाल भागातून श्री. चौधरी यांच्याशी बोलत होते. पंधरा यात्रेकरू दोन किलोमीटर मागे आहेत आणि दोन यात्रेकरूंनी सकाळी येऊ, अशी माहिती दिली आहे. सगळ्यांशी संपर्क झाला असून, सगळे व्यवस्थित आहेत, अशी व्यवस्थापक आणि श्री. चौधरी यांच्यातील भ्रमणध्वनीवरील संवादाची क्लीप कंपनीतर्फे जारी करण्यात आली आहे.

Web Title: Cloudburst In Amarnath 200 Devotees From Nandgaon Safe Latest Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..