कंपनीची केबल डॅमेज;
साडेतीन कोटींचे नुकसान
एमएनजीएलच्या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ८ : अंबड एमआयडीसी परिसरातील टेक्नोशेल कंपनीसमोर भूमिगत एचटी केबल ३३ केव्ही एक्सप्रेस फिडर लाइन जाणीवपूर्वक खोदून डॅमेज करण्यात आले. यामुळे कंपनीचे उत्पादन ठप्प होऊन साडेतीन कोटीचे नुकसान झाल्याची घटना घडली. याप्रकरणी एमएनजीएल कंपनीचे कॉन्ट्रक्टर आणि या कामावर देखरेख ठेवणारे योगेश नानकर यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जसवंत बहादुरसिंह जमादार (४०, रा. वासननगर, पाथर्डी फाटा) यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (ता. ६) सकाळी नऊ ते शनिवारी (ता. ७) मध्यरात्री एकदरम्यान ही घटना घडली. एमएनजीएल कंपनीची पाइपलाइन टाकण्यासाठी खोदकाम सुरू असताना, संबंधित ठिकाणाहून कंपनीची ३३ केव्हीची अंडरग्राऊंड एच. टी. आर्मड केबल गेली असल्याबाबतची पूर्वकल्पना असतानाही नानकर यांनी वीज महावितरणची कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नाही. तसेच सुरक्षेच्या नियमांची अंमलबजावणी न करता बोरिंग व खोदकाम करत ही एक्सप्रेस फिडर लाइन जाणीवपूर्वक दोन वेळा डॅमेज केली. या प्रकारामुळे अंदाजे २ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झालेच, शिवाय कंपनीचे उत्पादन पूर्णपणे बंद पडले. यामुळे ३ कोटी ५० लाख रुपयांचे नुकसान झाल. यामुळे कंपनीच्या भविष्यातील ग्राहकांच्या ऑर्डर्सवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याप्रकरणी फिर्यादीने विचारणा केली असता, नानकर याने शिवीगाळ केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत.