फोटो : H34937
पठारे हत्याकांडातील दोषींवर कारवाई करावी
काँग्रेसतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १३ : वैजापूर (जि.छत्रपती संभाजीनगर) येथील रोहित पठारे हत्याकांडाचा खटला जलदगती न्यायालयात चालविताना दोषींना कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ पक्षातर्फे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना शुक्रवारी (ता. १३) निवेदन देण्यात आले.
काँग्रेसतर्फे दिलेल्या निवदेनात म्हटले आहे, की रोहित पठारे या तरुणाचा जातीयवादी प्रवृत्तीच्या लोकांनी निर्घृण खून केला. जुन्या वादातून झालेल्या या घटनेत रोहितची प्राणघातक शस्त्रांनी हत्या करण्यात आली. या अमानुष घटनेमुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. राज्यात वाढलेल्या जातीय हिंसाचाराच्या घटना या कायदा आणि सुव्यवस्थेचे अपयश दर्शवित असल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेतील सर्व संशयितांना तात्काळ अटक करावी. या प्रकरणी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कठोर कलमे लावून निष्पक्ष तपास करावा. पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा. संशयित दोषींना फाशीची किंवा जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी. तसेच पीडित पठारे कुटुंबाला शासनाकडून भरीव आर्थिक मदत आणि पोलिस संरक्षण देण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या. काँग्रेसचे शहराध्यक्ष नीलेश खैरे यांच्या नेतृत्वाखाली निवेदनदेतेवेळी पक्षाच्या अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, महिला काँग्रेस अध्यक्षा स्वाती जाधव, माजी नगरसेवक रमेश जाधव, कुसुम चव्हाण, सारिका किर, अरुण दोंदे, युवक काँग्रेस अध्यक्ष जयेश पोकळे, अनिता खरारे, आदिनाथ नागरगोजे, प्रभाकर धात्रक यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.