Nashik News: त्र्यंबकेश्‍वर ज्योतिर्लिंगाच्या संवर्धनासाठी आजपासून 12 जानेवारीपर्यंत दर्शन बंद! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

trimbakeshwar shivlinga

Nashik News: त्र्यंबकेश्‍वर ज्योतिर्लिंगाच्या संवर्धनासाठी आजपासून 12 जानेवारीपर्यंत दर्शन बंद!

त्र्यंबकेश्‍वर (जि. नाशिक) : ज्योतिर्लिंग पिंडीच्या संवर्धनासाठी गुरुवारपासून (ता. ५) १२ जानेवारीपर्यंत भाविकांना दर्शन बंद असेल. पौषमध्ये भाविकांची वर्दळ कमी असते. त्यादृष्टीने ही वेळ निवडण्यात आली असण्याची शक्यता आहे.

औरंगाबादचे मीनलकुमार चावले यांच्यासह मुंबई, नाशिकमधील पुरातत्त्व विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित राहून पिंडीवर वज्रलेपाची प्रक्रिया करणार आहेत. गर्भगृहाचा चांदीच्या आवरणाचा नवीन दरवाजा १२ जानेवारीला लावण्यात येईल. (conservation of Trimbakeshwar Jyotirlinga darshan closed from today till January 12 Nashik News)

संवर्धनाचे काम चालू असताना त्रिकाळ पूजा सुरु राहणार आहे. त्यावेळी पुजारी आणि शागीर्दांना परवानगी असेल, असे सांगण्यात आले. सोळा वर्षांपूर्वी तयार झालेल्या गोंधळाची पुनर्रावृत्ती होऊ नये म्हणून त्र्यंबकेश्‍वर देवस्थान ट्रस्टतर्फे संबंधित विभागाच्या परवानगी घेऊन संवर्धनाचे काम सुरु करण्याची तयारी केली.

दरम्यान, पुरातत्त्व विभागाने ज्योतिर्लिंग पिंडीची झीज पाहून २५ फेब्रुवारी २००७ ला मध्यरात्री पिंडीवर वज्रलेप प्रक्रिया केली होती. त्यावेळी वज्रलेपाची वाच्यता न केल्याच्या कारणामुळे वादळी चर्चा झाली होती. मूळ पिंडीच्या आतील तीन लिंगाच्या रचनेत बदल केल्याने भाविक व पूजाधिकाऱ्यांसह शहरवासीयांनी त्यावेळी जिल्हाधिकारी आणि ग्रामीण पोलिस अधीक्षकांकडे तक्रारी केल्या होत्या.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

हेही वाचा: SAKAL Impact : पीबी बीएसस्सी नर्सिंगचे उमेदवारांना ठरविले पात्र; उमेदवारांना मिळणार संधी

त्यावेळी वज्रलेप प्रक्रिया पक्की न झाल्याने दोन ते चार वर्षांत पिंडीचा काही भाग निघू लागला. मध्यंतरी साळुंकीच्या बाजूची कडा निघाल्याचे समजल्याने विश्वस्त मंडळातर्फे पुरातत्त्व विभागाकडे पत्रव्यवहार करून पिंडीवर वज्रलेप केला जावा, अशी विनंती केली होती.

नोव्हेंबरमध्ये होणारी ही प्रक्रिया आता होत आहे. पुरातत्त्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली. विभागातील रासायनिक विभागातर्फे ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी कालावधी निश्चित करण्यात आला.

हेही वाचा: Nashik Rural Police Recruitment : मैदानी चाचणी देताना तरुणांचा लागला कस!