कोतवाल भरती परीक्षेला स्थगिती
---
राज्य सरकारचे आदेश : उमेदवारांमध्ये धाकधूक
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १३ : जिल्हा प्रशासनामार्फत महसूल सेवकांच्या (कोतवाल) रिक्त पदांसाठी रविवारी (ता. १५) होणाऱ्या लेखी परीक्षेला सरकारने स्थगिती दिली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार १७ जानेवारीला आता परीक्षा होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. ऐनवेळी परीक्षा स्थगित झाल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील कोतवालांच्या १५६ रिक्तपदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या पदांसाठी तब्बल चार हजार ६० इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी तीन हजार ३९ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. या पात्र उमेदवारांची रविवारी लेखी परीक्षा पार पडणार होती. मात्र, तत्पूर्वीच राज्य सरकारने या परीक्षेला स्थगिती दिली. त्यासंदर्भात गुरुवारी (ता. १२) सायंकाळी उशिराने जिल्हा प्रशासनाला आदेश प्राप्त झाले.
राज्यातील सहाही विभागांतील कोतवाल पदाच्या भरती प्रक्रियेला सरकारने हिरवा कंदील दिला होता. मात्र, नाशिक व कोकण वगळता उर्वरित चारही महसुली विभागांत विधान परिषद निवडणुकांमुळे भरती रखडली होती. दरम्यानच्या काळात महसूल विभागाने गट अ ते ड पदभरतीसंदर्भात राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडून अभिप्राय मागविला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नाशिक आणि कोकण विभागात आयोजित परीक्षेला राज्य सरकारने स्थगिती दिली. तसेच, सुधारित वेळापत्रकानुसार सहाही महसुली विभागांत १७ जानेवारीला लेखी परीक्षा होणार असून, १८ जानेवारीला निकाल घाेषित केले जातील. त्यामुळे कोतवाल होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या इच्छुक उमेदवारांना दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.