धुळे : टुडे पान २ साठी.. अवतीभवती
--
आज संविधान बांधिलकी
महोत्सव नियोजन बैठक
धुळे : भारतीय संविधानाचे समर्थन व पाठराखण करणाऱ्या जागरुक नागरिकांच्या सहभागातून ‘संविधान बांधिलकी महोत्सव’ आयोजित केला जाणार आहे. या महोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी महानगर नागरी संयोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी (ता. २४) सायंकाळी साडेपाचला संघमा चौकाजवळील गोळीबार टेकडी रस्त्यावरील उत्कर्ष हौसिंग सोसायटीतील कालिकादेवी नगर येथील अविनाश पाटील यांच्या भास्कर कार्यालयात होणार आहे. निवृत्त सनदी अधिकारी भा. ई. नगराळे बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. २६ नोव्हेंबर (संविधान स्वीकृती दिन) ते २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) दरम्यान विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, या बैठकीत कार्यक्रमांची रूपरेषा ठरवून जबाबदाऱ्यांचे वाटप केले जाईल. २००७ पासून महोत्सवाचे संस्थापक, संकल्पक व प्रवर्तक तसेच विवेकवादी, अंधश्रद्धा निर्मूलन व व्यसनमुक्ती प्रवर्तक अविनाश पाटील आणि महानगर नागरी संयोजन समितीने नागरिकांना बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
--
श्री त्रिविक्रम मंदिरात
महिनाभर काकडाआरती
धुळे : शहरातील गल्ली नंबर दोन येथील प्राचीन श्री त्रिविक्रम मंदिरात कार्तिक महिन्यानिमित्त २६ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर या कालावधीत कार्तिकस्नान समारंभ व काकडाआरतीचे आयोजन केले आहे. वामन अवताराचे मोठे रूप असलेल्या भगवान त्रिविक्रमांच्या या महोत्सवात दररोज सकाळी सहाला काकडाआरती व अभिषेक, हरिपाठ, सकाळी नऊला शृंगार आरती, दुपारी भजन आणि विष्णुसहस्रनाम आदी विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या महोत्सवाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर संस्थानचे अध्यक्ष प्रा. देवेंद्र डोंगरे, सचिव चंद्रकांत नाईक व विश्वस्तांनी केले आहे.
--
‘बाजारभावाची माहिती
सोशल मीडियावर द्या’
धुळे : धुळे तालुक्यातील सर्व शेतीमालाची खरेदी आणि विक्री धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून होते. तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीचे योग्य नियोजन करता यावे, यासाठी रोज सायंकाळी शेतीमालाची आवक व दर याविषयीची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाजप ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी केली आहे. याबाबत त्यांनी बाजार समितीचे सभापती व सचिव यांना निवेदन दिले आहे. बाजार समितीने फेसबुक पेज आणि व्हॉट्सॲप लिंक सुरू करावी. यामुळे रोजचे बाजारभाव, शेतीमालाची आवक आणि बाजार समितीचे व्यवहार सुरू आहेत की बंद, याची माहिती शेतकऱ्यांना घरबसल्या मिळण्यास मदत होईल, असे निवेदनात नमूद केले आहे.
--
राजवाडे ग्रंथालयात
दिवाळी अंक उपलब्ध
धुळे : वाचकांसाठी साहित्याची मेजवानी ठरणारा आणि सभासदांचा दिवाळी आनंद द्विगुणित करणारा स्तुत्य उपक्रम राजवाडे ग्रंथालयातर्फे हाती घेण्यात आला आहे. यंदा वाचक व सभासदांसाठी वेगवेगळ्या विषयांवरील तब्बल १०० ते १५० दर्जेदार अप्रतिम दिवाळी अंक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. धनत्रयोदशीनिमित्त येत्या सहा नोव्हेंबरला ग्रंथालयात या अंकांचे समारंभपूर्वक वितरण होईल. यात विनोदी, ललित, रहस्यकथा, ज्योतिष, विज्ञान, आरोग्य, महिलांसाठी सौंदर्य व पाककला, कथा- कादंबऱ्या तसेच बालगोपाळांसाठी खास निवडक बाल- अंकांचा समावेश असणार आहे. विशेष म्हणजे हे सर्व अंक सभासदांना वर्षभर वाचण्यासाठी उपलब्ध राहणार आहेत. धुळेकर वाचकप्रेमींनी या अनोख्या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष संजय मुंदडा, सचिव जयश्री शहा यांनी केले आहे.