पान दोन ॲंकर
-----------------
08885
घोटी : राज्यस्तरीय संविधान प्रशिक्षण कार्यशाळेत मार्गदर्शन करताना संविधान अभ्यासक आणि व्याख्याते तुषार पगारे शेजारी बाळासाहेब मुंडे,किशोर सोनवणे व आदी मान्यवर.
भारतीय संविधानातून समानता, बंधुभावाची शिकवण
तुषार पगारे : इगतपुरीत राज्यस्तरीय शासकीय संविधान प्रशिक्षण कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
इगतपुरी, ता.२ : भारतीय संविधान कोणत्याही जातीधर्माचा अनादर करायला शिकवत नाही, तर प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार समानता आणि बंधुभावाची शिकवण देते, असा महत्त्वपूर्ण संदेश ‘समय सूचक बहुउद्देशीय संस्थे’चे संस्थापक अध्यक्ष तुषार पगारे यांनी दिला.
घोटी (ता. इगतपुरी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले येथे महाराष्ट्र शासनाच्या संविधान जनजागृती अभियानांतर्गत ‘वारी संविधानाची, आली आपल्या दारी’ व राज्यस्तरीय १४३२ वी शासकीय संविधान प्रशिक्षण कार्यशाळा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व भारतीय संविधानाचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
पगारे यांनी संविधानातील विविध तरतुदी, मूलभूत अधिकार,नागरिकांची कर्तव्ये आणि लोकशाही व्यवस्थेचे महत्त्व अत्यंत सोप्या, ओघवत्या व अभ्यासपूर्ण भाषेत स्पष्ट केले. संविधान हे केवळ पुस्तक नसून देशातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनाला दिशा देणारे आणि लोकशाहीला बळकटी देणारे सर्वोच्च मार्गदर्शक तत्त्व असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
सिद्धार्थ मेहेरखांब यांनी लोकशाही व्यवस्थेतील नागरिकांची भूमिका, संविधानाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व, सामाजिक सलोखा आणि घटनात्मक मूल्यांचे पालन याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. संविधानाची खरी ताकद ही नागरिकांच्या जागरूकतेत असून प्रत्येकाने आपल्या अधिकारांसोबत कर्तव्यांचीही जाणीव ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी गटविकास अधिकारी महेश वळवी, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब मुंडे, किशोर सोनवणे, सोमनाथ एखंडे,निशांत पगार यांची विशेष उपस्थिती लाभली. इगतपुरी तालुक्यातील ३२२ शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मुख्याध्यापक शिवाजी थेटे यांनी सूत्रसंचालन केले.