प्लायर
--
मध्यवर्ती कारागृहात बंदिवानांना दूषित पाणीपुरवठा?
तपासणी अहवाल सादर करण्यासाठी महापालिकेशी पत्रव्यवहार
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १३ : नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहात विविध कारणांनी शिक्षा भोगणाऱ्या ४२०० बंदिवानांना महापालिकेमार्फत होणाऱ्या पाणीपुरवठ्यातून जलजन्य आजाराची भिती व्यक्त करण्यात आली आहे. पाण्याच्या शुद्धतेबाबत तपासणी करून कारागृह प्रशासनाला अहवाल सादर करावा, अशी विनंती जेल प्रशासनाने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे केल्याने खळबळ उडाली आहे.
पाणी तपासणी अहवालातून पाण्याच्या शुद्धतेबाबत स्पष्ट होईल, दुसरीकडे अहवाल नकारात्मक आल्यास नाशिक रोड भागातील अनेक केंद्र व राज्य सरकारची कार्यालयांच्या पाणीपुरवठ्याबाबतही साशंकता निर्माण होण्याची शक्यता आहे. नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील सुमारे ४,२०० बंदिवानांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, कारागृहात पुरविल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेबाबत संशय व्यक्त करण्यात आल्याने पाण्याची तातडीने तपासणी करून अहवाल देण्याची मागणी कारागृह प्रशासनाने नाशिक महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे केली आहे. कारागृह अधीक्षक अरुणा मुगुटराव आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास त्र्यंबकांत विभूते यांनी यासंदर्भात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठवले आहे. कारागृहात न्यायाधीन आणि शिक्षाबंदी मिळून सुमारे ४,२०० कैदी असून त्यामध्ये महिला तसेच लहान मुलांचाही समावेश असल्याने एवढ्या मोठ्या संख्येला पुरवले जाणारे पाणी आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित असणे आवश्यक असल्याचे पत्रात नमूद केले आहे. पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी करण्याचे वरिष्ठ कार्यालयाचे निर्देश असून पाणी दूषित असल्यास त्यातून जुलाब, ताप यासह विविध जलजन्य आजारांचा फैलाव होण्याची शक्यता असून कारागृहासारख्या बंदिस्त परिसरात संसर्गजन्य आजार पसरल्यास त्यावर नियंत्रण मिळवणे मोठे आव्हान ठरू शकते, त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पाण्याची गुणवत्ता तपासणे गरजेचे असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
------------चौकट
गुणवत्ता निश्चित करावी
या पार्श्वभूमीवर बंदिवानांसाठी वापरण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे नमुने तातडीने तपासून त्याची गुणवत्ता निश्चित करावी, अशी विनंती करण्यात आली असून ४,२०० बंदीजनांच्या आरोग्याशी संबंधित हा विषय असल्याने महापालिकेचा पाणी तपासणी अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे.
--------------------------