
Nashik News : साईबाबानगरात दूषित पाणीपुरवठा; मनपा प्रशासनाकडून उपाययोजना झाली नसल्याचा आरोप
Nashik News : परिसरातील साईबाबानगर येथील काही रहिवाशांच्या घरात दूषित पाणी येत असून, यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनासह आरोग्याचाही प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत मनपा प्रशासनाने काहीही उपाययोजना केली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. (Contaminated water supply in Saibabanagar Allegation that measures have not been taken by NMC administration Nashik News)
रमजानचा पवित्र महिना सुरू असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवासारखे सणसूद असताना साईबाबानगर मधील काही रहिवाशांच्या घरात ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. येथील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासह घरगुती वापरासाठीदेखील पाणी नसल्याने प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सिडको विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या पाणीपुरवठा विभागास याबाबत वारंवार तक्रार देऊनही अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांनी येथे येऊन काम करण्याची तर सोडाच पण विचारपूस करण्याचीही तसदी घेतली नसल्याचा गंभीर आरोप रहिवाशांनी केला आहे.
पिण्याचे पाणी अगदी काळे येत असून पाण्यास ड्रेनेजच्या गटारी प्रमाणे दुर्गंधी येत आहे. या वेळी परिसरातील अनिल आठवले, सविता सोनवणे, उषा अहिरे, वंदना जगताप, लता नांद्रे, अलका कुमावत, सुनंदा मोरखडे, सुनीता जाधव, अनिल सोनवणे, दत्तात्रेय जगताप, अनिल कळंके, राजदार नांद्रे, देवा वाघमारे आदींसह नागरिक उपस्थित होते.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
"आठवडाभरापासून दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असून, याबाबत महापालिका प्रशासनास वेळोवेळी नागरिकांनी तक्रार करूनदेखील अधिकारी अथवा कर्मचारी येथे फिरण्यास तयार नाही. दूषित पाणी नागरिकांच्या आरोग्यास मोठ्या प्रमाणावर घातक असून यामुळे विविध आजारांना सामोरे जावे लागेल यात शंकाच नाही."- केसर बानू शेख, रहिवासी
"साईबाबानगर येथील काही नागरिकांच्या घरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने त्यावर मनपा प्रशासनाने त्वरित कार्यवाही करणे गरजेचे आहे. सणासुदीच्या काळात लोकांच्या घरात पिण्यासाठी पाणी नाही, ही मोठी शोकांतिका आहे."- अनिल आठवले, सामाजिक कार्यकर्ते
"दूषित पाणीपुरवठा नागरिकांच्या आरोग्यास घातक असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मागविला असता तोही उपलब्ध करून देण्यात मनपा अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली. घरात वापरण्यास देखील पाणी नाही."- वंदना जगताप, रहिवासी