(टुडे पान एक मेन लिड करणे)
फोटो : NSK26H33019
नंदुरबार : जनसंवाद कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतांना आमदार चंद्रकांत रघुवंशी. शेजारी ॲड. राम रघुवंशी.
--------------------------
दुष्काळात सहा तास अखंड वीजपुरवठा करावा
आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी महावितरणला सुनावले
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १९ : दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आधीच संकटात आहे. अशा परिस्थितीत अनियमित वीजपुरवठा आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून होणारी अडवणूक अजिबात खपवून घेतली जाणार नाही. शासनाच्या धोरणानुसार शेतीसाठी मिळणारा सहा तासांचा वीजपुरवठा अखंडितपणे सुरू ठेवावा. शेतकऱ्यांच्या वीजविषयक समस्यांचे तातडीने निराकरण करावे, असा स्पष्ट इशारा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिला. ‘शेतकरी जनसंवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करून त्या सोडविण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
--------
नंदुरबार तालुक्यातील शेतकऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा, जळालेले रोहित्र, जीर्ण विद्युत खांब, तुटलेल्या तारा आणि कर्मचाऱ्यांच्या असहकार्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्यांबाबत शेतकऱ्यांनी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले होते. आमदार रघुवंशी यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कार्यवाहीची सूचना केली. त्यानुसार सोमवार ता. १९ ला नंदुरबार नगरपरिषदेच्या लोकनेते स्व. माणिकराव गावित सभागृहात ‘शेतकरी जनसंवाद’ उपक्रम घेण्यात आला. या वेळी शेतकऱ्यांनी विविध समस्या मांडल्या. संबंधित प्रश्नांचे निराकरण करण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.
दुष्काळाच्या संकटात वीजपुरवठा आवश्यक
आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, सध्या दुष्काळाचे सावट गडद होत आहे. शेतकऱ्यांना पिके वाचविण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे. सध्या काही शेतकऱ्यांकडे विहिरी आणि बोअरवेलमध्ये पाणी उपलब्ध असले. तरी आगामी काळात भूजलपातळी खालावण्याची शक्यता आहे. या उपलब्ध पाण्याचा उपयोग करून पिके जगविण्यासाठी नियमित वीजपुरवठा आवश्यक आहे. शासनाच्या धोरणानुसार सहा तास वीज देण्याची तरतूद असताना प्रत्यक्षात अखंडित वीज मिळत नसल्याची बाब गंभीर आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे महावितरणने दुर्लक्ष करू नये, असे निर्देश आमदारांनी दिले.
स्मार्ट मीटरवरून महावितरणला सुनावले
वीज स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरही आमदार रघुवंशी यांनी नाराजी व्यक्त केली. स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांवर सक्ती केली जात असल्याच्या तक्रारींमुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले. मीटर बसविण्याबाबत ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. नागरिकांच्या नाराजीकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर पडसाद उमटू शकतात, असा इशाराही त्यांनी दिला.
कर्मचाऱ्यांच्या अरेरावीवर कारवाई
महावितरणचे अधीक्षक अभियंता एस. एस. दराडे यांनी दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना वीजपुरवठ्याबाबत अडचणी येऊ नयेत, यासाठी आवश्यक दक्षता घेतली जात असल्याचे सांगितले. सध्या विजेची मागणी वाढल्यामुळे काही अडचणी निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, शेतकऱ्यांशी अरेरावीची भाषा वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी, महावितरणचे अधीक्षक अभियंता एस. एस. दराडे, कार्यकारी अभियंता अतुल गायधनी, शेतकी संघाचे चेअरमन बी. के. पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती विक्रमसिंह वळवी, माजी जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार, अतिरिक्त कार्यकारी अभियंता एम. आर. कोठारी आणि प्रभारी कार्यकारी अभियंता आर. एन. पाटील उपस्थित होते.
-----------
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
- नादुरुस्त व जळालेले विद्युत रोहित्र तातडीने बदलणे
- जीर्ण झालेले विद्युत खांब बदलणे
- शेतीसाठी सहा तासांचा वीजपुरवठा अखंडित सुरू ठेवणे
- शेतातील लोंबकळणाऱ्या विद्युत तारा हटविणे
- तुटलेल्या विद्युत तारा व जळालेल्या रोहित्रांची तातडीने दुरुस्ती करावेत