धर्मांतराचे आमिष;
एरंडोलला एकवर गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
एरंडोल, ता. ३ ः पैशांचे आमिष व आजारांवरील उपचाराचे आश्वासन देऊन धर्मांतर करण्यास सांगणाऱ्या धरणगाव येथील एका संशयिताविरोधात शंकर बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
यासंदर्भात सकल हिंदू समाजातर्फे पोलिस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की कैलास सहादर बारेला (रा. धरणगाव) पैशांचे आमिष, आजारांवरील उपचाराचे आश्वासन देऊन सर्व प्रकारच्या आर्थिक गरजा पूर्ण करतो, असे सांगून धर्मांतर करण्यास सांगताना आढळला आहे. संशयित बारेला याने गेल्या काही वर्षांपासून गरीब व आदिवासी लोकांना धर्मांतर करण्यास भाग पाडले आहे. त्यामागे तो एकटा नसून मोठ्या शक्ती असण्याची दाट शक्यता आहे. धर्मांतराच्या त्याच्या या कृत्यात कोण कोण सहभागी आहे? त्याला स्थानिक पातळीवर कोणाची साथ आहे? त्याला आर्थिक मदत कुठून येते, याचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. यासंदर्भात योग्य ती कसून चौकशी न झाल्यास सकल हिंदू समाजातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनात दिला आहे.
दरम्यान, याबाबत शहरातील केवडीपुरा येथील शंकर बोरसे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यावरून संशयित कैलास बारेलाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.