
नाशिक : करमाळा (ता. सोलापूर) येथील सावडी येथील शीतल नानासाहेब ठेंबे या मानाच्या रिव्हॉल्व्हरच्या मानकरी ठरल्या. पोलिस अकादमीतर्फे उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक यांना देण्यात येणाऱ्या सर्व पाच पुरस्कार शीतलसह सोलापूरच्याच संध्याराणी देशमुख यांनी पटकाविले. या वेळी ३९४ नवे पोलिस उपनिरीक्षक पोलिस सेवेत दाखल झाले.
प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक बॅच क्रमांक १२० चा दीक्षान्त संचलन सोहळा शनिवारी (ता. २५) येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीमधील मुख्य कवायत मैदानावर पार पडला. ३९४ प्रशिक्षणार्थींनी पोलिस अधिकारी म्हणून शपथ घेतली. यामध्ये २७९ पुरुष, तर ११६ महिला प्रशिक्षणार्थी सहभागी होते. यामध्ये ३८ प्रशिक्षणार्थी हे पदव्युत्तर पदवीप्राप्त होते.
प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस महासंचालक रजनीश शेठ, अपर पोलिस महासंचालक संजय कुमार, पोलिस अकादमीचे संचालक राजेश कुमार आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी, मानाची रिव्हॉल्व्हर आणि उत्कृष्ट अभ्यासू प्रशिक्षणार्थीचा पुरस्कार शीतल ठेंबे यांनी, तर अहिल्याबाई होळकर उत्कृष्ट महिला प्रशिक्षणार्थी आणि उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी (द्वितीय) पुरस्कार संध्याराणी दत्तात्रय देशमुख यांनी पटकाविला. १२ महिन्यांच्या या प्रशिक्षणकाळात या प्रशिक्षणार्थींना भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, भारतीय पुरावा कायदा, स्थानिक व विशेष कायदे, न्यायसहाय्यक विज्ञान, सायबर क्राइम, गुन्हेगारी शास्त्र, बाह्यवर्ग पद कवायत, गोळीबार सराव आदींचे प्रशिक्षण देण्यात आले.
सायबर, आर्थिक गुन्हेगारी मोठे आव्हान : रजनीश शेठ
पोलिस महासंचालक रजनीश शेठ म्हणाले, की आताचा काळ हा सोशल मीडियाचा आहे. सोशल मीडियामध्ये व्यक्त केलेले विचार अनेकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न करतात. सोशल मीडियासह ऑनलाइनद्वारे आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. सायबर आणि आर्थिक क्षेत्रात नवनवीन प्रयोगामुळे या गुन्हेगारीवर आळा घालणे हे पोलिस दलासमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे सेवेत काम करत असताना शक्य होईल सेवांतर्गत प्रशिक्षण, ऑनलाइन कोर्सेस प्रशिक्षण घेऊन आपले ज्ञान वाढवा. समाजातील प्रत्येक घटक तक्रार घेऊन आला असता, त्याच्या तक्रारीचे निवारण करा, संवेदनशील राहा, चांगला संपर्क, संवाद ठेवा. पोस्टिंग मिळेल तिथे चांगले काम करून दाखवा.
शेतकरी कन्या शीतल बनली फौजदार
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील सावडी येथे राहणाऱ्या शीतल ठेंबे यांनी आपल्या कामगिरीच्या जोरावर उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी, मानाची रिव्हॉल्व्हर आणि उत्कृष्ट अभ्यासू असे तीन पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत. लहानपणापासून शीतल यांना पोलिस अधिकारी होण्याची इच्छा होती. २०१४ पासून दोन प्रयत्नांमध्ये अपयश आल्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात २०१८ मध्ये पोलिस
उपनिरीक्षकपदाला गवसणी घातली. प्रशिक्षण पूर्ण करत तीन पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्याला प्रचंड आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्या दिवसापासूनच प्रत्येक ठिकाणी प्रथम राहण्याचा पूर्ण प्रयत्न केला. कशातही कुचराई केली नसल्याचे शीतल यांनी सांगितले. यापुढे देखील परीक्षा देत आणखी पुढे जाणार असल्याचा मानस शीतल ठेंबे यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.