esakal | कोरोनामुळे अंत्यसंस्कारानंतरच्या विधींना कात्री; सख्खे सोयरेही विधींपासून दूर

बोलून बातमी शोधा

funeral

कोरोनामुळे अंत्यसंस्कारानंतरच्या विधींना कात्री; सख्खे सोयरेही विधींपासून दूर

sakal_logo
By
दत्ता जाधव

पंचवटी (नाशिक) : कोरोनामुळे अनेकांना जवळच्या नातेवाइकांपासूनही दूर केल्याचे कटू व परंतु वास्तव घटना समोर येऊ लागल्या आहेत. आपल्याला लागण होईल की काय भीतीने अनेकजण मृत झालेल्या नातेवाइकांपासून दूर राहात असल्याच्या घटना पाहून मन सुन्न झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

जमिनीवरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ

कधीकाळी दोन-चार दिवसांनी एखादा अंत्यसंस्कार होणाऱ्या म्हसरूळ स्मशानभूमीत सध्या दिवसाला सात-आठ मृतदेहांवर अंत्यसंस्कार सुरू आहेत. याठिकाणी अंत्यसंस्कारासाठी केवळ तीनच बेड आहेत. त्यामुळे अनेकांवर जमिनीवरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. याठिकाणी लागणारा लाकडांचा ठेका एका माजी नगरसेवकाकडे आहे. मध्यंतरी त्यांचेही निधन झाले. म्हसरूळला अंत्यसंस्काराचे प्रसंग क्वचित येत असल्याने संबंधित नगरसेवक स्मशानभूमीत मृतदेह पोचताच त्याठिकाणी घराजवळ असलेल्या लाकडांतून स्मशानापर्यंत लाकडे पोचवत असत. परंतु, काही दिवसांपासून एकामागून एक मृतदेह येत असल्याने संबंधितांनी सर्व लाकडे स्मशानभूमीतच नेऊन ठेवली आहे, यावरून येथील भयावहतेची कल्पना येते.

कर्मचाऱ्यांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ

गुरुवारी (ता.२१) याठिकाणी एक मृतदेह घेऊन शववाहिनी आली. विशेष म्हणजे या मृतदेहाबरोबर संबंधितांचे कुटुंब कोणीही नव्हते. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना या मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागले. यावरून जवळचे नातेवाईकही कसे दुरावत आहेत, याचा अनुभव येतो. सायंकाळी येथील एक कर्मचारी मृतदेहाच्या अस्थी मडक्यात भरत होता, त्याला विचारले असता संबंधितांनी आम्ही उशिरा येतो, तेव्हा रक्षा गोळा करण्यासाठी सांगून गेल्याचे सांगितले. यावरून नातेवाइकांना रक्षा घेण्यासाठीही वेळ नसल्याने जग किती बदलत आहे, याची प्रचीती आली.

सख्खे सोयरेही विधींपासून दूर

हिंदू धर्मात अंत्यसंस्कारानंतर तेराव्याला तेरा जणांना जेऊ घालण्याची प्रथा आहे. परंतु सध्याची परिस्थिती बघता तेराव्यासाठी सोडाच त्यानंतर दर महिन्यासाठीही लागणारा एक उपवासकरू मिळणे दुरापास्त झाले आहे. अनेकांनी या विधींकडे पाठ फिरविल्याने यापुढे दहावे अन् तेरावेही होतील की नाही? अशी परिस्थिती ओढावली आहे. दूरचे नातेवाईक सोडा, जवळचे सख्खे सोयरेही या विधींपासून दूर पळत असल्याचे विदारक परंतु वास्तव चित्र यानिमित्ताने समोर आले आहे.