#Coronafighters : "त्याच निडरपणाने कोरोना संशयिताचे "स्वॅब'ही पुण्याला पोच करतो...भीती वाटली नाही" सलाम त्या दोघांना..!

nashik district hospital.jpg
nashik district hospital.jpg

नाशिक : कोरोना विषाणू तर आत्ता-आत्ता आला हो; पण गेल्या पाच ते सहा वर्षांपासून आपल्याकडे स्वाइन फ्लू होता. रुग्ण आला की त्याच्या "स्वॅब'चे नमुने न चुकता पुण्याला पोच करत आलो. भीती वाटली नाही. काळजीपूर्वक नेण्याची दक्षता मात्र घेत आलो, असे एकदम निडरपणे सांगतात, जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना विषाणू विलगीकरण कक्षातील बाळूमामा. बाळूमामांच्या अनुपस्थितीत ही निरडता दत्तामामा दाखवितात. 

कोरोना संशयितांचे "स्वॅब' बाळूमामा अन्‌ दत्तामामा पोचवतात
बाळूमामा 2001 मध्ये जिल्हा रुग्णालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून नियुक्त झाले. कोणत्याही कामाची लाज न बाळगता ती तितक्‍याच आत्मविश्‍वासाने पार पाडणारे बाळूमामा जिल्हा रुग्णालयात परिचित आहेत. सुरवातीला त्यांनी जिल्हा रुग्णालयातील विविध कक्षांमध्ये वॉर्डबॉय म्हणून काम केले. मात्र सात वर्षांपूर्वी जिल्ह्यात स्वाइन फ्लूची साथ आली. त्या वेळी रुग्णालयात विशेष स्वाइन फ्लू कक्ष सुरू करण्यात आला. तेव्हापासून बाळूमामांची या कक्षात नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याकडे स्वाइन फ्लूच्या रुग्णांच्या "स्वॅब'चे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पोचविण्याची जबाबदारी देण्यात आली. ती जबाबदारी गेल्या सात वर्षांपासून पार पाडत असतानाच आता जगात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना संशयित रुग्णांचे "स्वॅब' बाळूमामा गेल्या 28 फेब्रुवारीपासून पुण्याच्या प्रयोगशाळेत पोच करत आहेत. 

दत्तामामांचा अनुभव असा...
गेल्या तीन आठवड्यांपासून सततचा पुण्याचा प्रवास होत असल्याने बाळूमामांच्या अनुपस्थितीमध्ये दत्तामामा पुण्याला जातात. दत्तामामांची नर्सिंग महाविद्यालयात चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून नियुक्ती असून, तेही या कक्षात आपली जबाबदारी पार पाडतात. 2009 मध्ये जिल्हा रुग्णालयात दत्तामामांना जळीत कक्षात (बर्न वॉर्ड) नियुक्ती मिळाली. पहिल्या दिवशी एक लहान मुलगी गंभीररीत्या भाजलेली आली असता, तिला पाहून तिच्या सख्खा मामाला भोवळ आली. मग दत्तामामा पुढे धावून आले आणि त्या भाजलेल्या मुलीला कवेत घेऊन तिसऱ्या मजल्यावरील जळीत कक्षात उपचारासाठी घेऊन गेले. 

आदेश येताच पुण्याकडे 
गेल्या तीन आठवड्यांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव राज्यात वाढला. नाशिकमध्ये विशेष कक्षात कोरोना संशयित रुग्ण दाखल झाले. सर्वांच्या "स्वॅब'चे नमुने बाळूमामा रोज सायंकाळी पुण्याला पोच करत आहेत. तेही एसटीने प्रवास करत. कक्षातून नमुन्यांचे सीलपॅक कीट घेतल्यानंतर सायंकाळी, रात्री, अपरात्री रुग्णालय प्रशासनाचा आदेश मिळताच ते राज्य परिवहन मंडळाच्या बसने पुण्याकडे जायला निघतात. पाच ते सहा तासांचा प्रवास करीत "स्वॅब'चे कीट प्रयोगशाळेत सोपवून आवश्‍यक पूर्तता केल्यानंतर परत नाशिकच्या दिशेने माघारी फिरतात. सकाळी आल्यानंतर पुन्हा दुपारी कक्षामध्ये नित्याच्या कामावर हजर होतात. 

त्याच निडरपणे कोरोना व्हायरस संशयिताचे "स्वॅब'ही पोच करतो

स्वाइन फ्लूचा धोका वाढला तेव्हा "स्वॅब' पोचविण्याची जबाबदारी घेण्याचा विषय निघाल्यावर अनेकांनी नकार दिला. मी तयार झालो. मला अनेकांनी लागण होण्याची भीती दाखवली. मात्र आजतागायत कधीही घाबरलो नाही. "स्वॅब'च्या नमुन्यांचे कीट "सीलपॅक' असते. त्याच निडरपणे कोरोना संशयिताचे "स्वॅब'ही पोच करतो. -बाळूमामा, कर्मचारी, जिल्हा रुग्णालय 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com