कोरोनाच्या डावापुढे पहिलवानकी चितपट! तालीम, स्पर्धा बंद झाल्याने हिरमोड

दीड वर्षापासून कोरोना महामारीने जगभर थैमान घातले आहे. कोरोनामुळे सर्व जनजीवनच विस्कळित झाले आहे.
wrestling
wrestling Google

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : दीड वर्षापासून कोरोना महामारीने (Corona Epidemic) जगभर थैमान घातले आहे. कोरोनामुळे सर्व जनजीवनच विस्कळित झाले आहे. ग्रामीण भागातील चैत्रातील यात्रा, विविध उरसांसह सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी आली आहे. त्यामुळे कोणत्याही स्पर्धा नाहीत. त्यातच नाशिक जिल्ह्यातील चाळीसहुहून अधिक तालमींना टाळे लागले आहे. तालीम बंद असल्याने सराव नाही, स्पर्धा नाही. त्यामुळे स्पर्धेतून येणाऱ्या बक्षिसांवर घेता येणारा खुराक बंद आहे. कोरोनाच्या डावापुढे पहिलवानांनाच (wrestler) चीतपट होण्याची वेळ आली आहे. शड्डू ठोकणे थांबले असून, अनेकांनी पहिलवानकीला रामराम ठोकला आहे. (Corona has shut down wrestling practice and competitions In Nashik)


नाशिक जिल्ह्याला तालीम, आखाडे व पहिलवान यांची मोठी परंपरा आहे. नाशिकच्या पहिलवानांनी राज्य व देशपातळीवर दिग्गजांना आस्मान दाखविले. गेल्या वर्षी मार्चपूर्वी नाशिक जिल्ह्यात चाळीसहून अधिक तालमीत सुमारे ५०० पहिलवान डावपेच शिकत सराव करीत होते. लाल मातीतील या रांगड्या व ताकदीच्या खेळात आपल्या तालमीतील पहिलवान वरचढ ठरावे म्हणून तेथील वस्ताद मेहनत घ्यायचे. शरीरयष्टीच्या ‘एक से बढकर एक’ पहिलवानांनी बहरलेल्या तालमी सध्या कुलूपबंद आहेत.

wrestling
कोरोना काळात पालक गमावलेल्‍या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मिळणार पाठबळ


ग्रामीण भागात चैत्रात विविध यात्रा भरतात. यानिमित्त कुस्ती स्पर्धा होतात. बक्षिसांची लयलूट होते. मात्र, दीड वर्षापासून कोरोना संसर्ग वाढल्याने धार्मिक उत्सवानिमित्त भरणाऱ्या यात्रा, जत्रा, उरूस रद्द झाले आहेत. यात्रांतील स्पर्धांमध्ये जिंकलेल्या कुस्तीच्या बक्षिसांवर पहिलवान वर्षभराच्या खुराकाची तजवीज करत असतात. सध्या कुस्त्यांचे फड बंद असल्याने उद्योन्मुख पहिलवानांना खुराकासाठी आर्थिक कोंडीचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे झालेल्या टाळेबंदीत व्यायामशाळा, तालीम बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे पहिलवानांच्या सरावालाही ब्रेक लागला आहे.


अनेकांनी घरीच व्यायामावर भर दिला असला तरी सरावासाठी कुस्तीच्या लढतीची गरज असते. त्यातच स्पर्धा नसल्याने जवळ पैसेही नाहीत. खुराकासाठी उसनवारी करत आर्थिक कोंडीचा सामना करावा लागत आहे. परिणामी वाढते वय आणि कुस्तीचे आखाडे बंद झाल्याने नाइलाजाने लाल मातीचे स्वप्न जगणाऱ्या अनेक युवा पहिलवानांना पहिलवानकी सोडावी लागत आहे.

तालमीमध्ये शुकशुकाट

नाशिक जिल्ह्यात ४० हून अधिक तालमींमध्ये सध्या शुकशुकाट दिसत आहे. त्यात भगूरची बलकवडे तालीम, नाशिकची दांडेकर, मोहन तालीम, खैरे तालीम, साकूर फाटा (इगतपुरी) येथील गुरू हनुमान तालीम, मालेगावचे दीपक पाटील, इगतपुरीचे दादा मांडे, सिन्नरचे लोंढे, नांदगावला संजय पवार, मनमाड येथे साईनाथ गिडगे अशा तालमीतील धुराळा थंडावला आहे. सुमारे ५०० पहिलवान लाल मातीच्या कुस्तीच्या तालमीला पोरके झाले आहेत.

या पहिलवानांनी गाजवल्या कुस्ती स्पर्धा

नाशिक जिल्ह्यातील तालमीतून अनेक पहिलवानांनी राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळविला आहे. त्यात मोहन प्यारे, पंढरीनाथ बोरस्ते, गोरख बलकवडे, रामदास सुरडे, प्रा. रवींद्र मोरे, हर्षल सदगीर, रमेश कुकडे, धर्मा शिंदे अशा पहिलवानांनी नाशिकचे नाव कुस्ती स्पर्धेत गाजवले आहे.

नाशिक जिल्ह्यातील या स्पर्धा थांबल्या

नाशिक महापौर केसरी, श्रीराम केसरी (पिंपळगांव बसवंत), जिल्हा तालीम संघ केसरी (नाशिक), कसबे सुकेणे (ता. निफाड) येथील स्व. माधवराव पहिलवान उत्तर महाराष्ट्र केसरी स्पर्धा, ओझर येथील खंडेराव महाराज यात्रोत्सव कुस्ती दंगल,

wrestling
म्‍युकरमायकोसिसकरिता लागणाऱ्या इंजेक्शनचा काळा बाजार! नातेवाइकांची होतेय दमछाक

लाल मातीतील कुस्ती ही महाराष्ट्राचे वैभव आहे. कुस्तीसारख्या मर्दानी खेळाला कोरोनामुळे निर्बंध आले आहेत. कोरोना काळात महाराष्ट्र शासनाने होतकरू पहिलवानांना आर्थिक मदत करत कुस्तीचा वारसा जपला पाहिजे.
- प्रा. रवींद्र मोरे, कुस्ती प्रशिक्षक, पिंपळगाव बसवंत

ग्रामीण भागातील बहुतांश पहिलवान सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील असतात. अनेक पहिलवान आर्थिक परिस्थिती बिकट असताना पहिलवानकी जपत आहेत. परंतु, कोरोनाने सर्व घडी विस्कटली आहे. कोरोना काळात पहिलवानांना शासनाने आर्थिक मदत दिल्यास कुस्ती क्षेत्राला संजीवनी मिळेल.
- ॲड. बाळासाहेब जाधव, संयोजक, स्व. माधवराव पहिलवान उत्तर महाराष्ट्र केसरी स्पर्धा, कसबे सुकेणे

(Corona has shut down wrestling practice and competitions In Nashik)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com