लाचखोर अभियंत्याचा
जामीन अर्ज फेटाळला
साथीदार कनिष्ठ अभियंत्याला जामीन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ५ : पिंप्री खुर्द येथील रस्ता कॉंक्रिटीकरण बिलाच्या मंजुरीसाठी दहा हजार रुपयांच्या लाचप्रकरणी अटकेतील जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अधिकारी सतीश शिसोदे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर त्यांनी दाखल केलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. याच प्रकरणातील कनिष्ठ अभियंता भागवत चवरे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांनी सादर केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. अटी-शर्तीवर त्यांना जामीन मंजूर झाला. पिंप्री खुर्द येथे रस्ता कॉंक्रिटीकरणाच्या कामाची एमबी (मोजणी पुस्तिका) व बिले तयार करण्यासाठी कनिष्ठ अभियंता भागवत चवरे यांनी तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर अभियंता चवरे यांनी बिलांवर सही करून पुढील मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे पाठविण्यासाठी उपविभागीय अधिकारी शिसोदे यांच्यासाठी एकूण बिलाच्या १.५ टक्क्यांप्रमाणे १५ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडअंती दहा हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांना पकडले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात दोघांना पोलिस कोठडी मिळाली. दोघांना न्यायालयात हजर केले. शिसोदे यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांची कारागृहात रवानगी झाली.