भूमी अभिलेख उपअधीक्षक
पाचशे रुपयांसाठी जाळ्यात
‘लाचलुचपत’ ची कारवाई : गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
सटाणा-नाशिक, ता. ३ : वडिलोपार्जित घरावर वारसा हक्काने नाव लावून देण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रचलेल्या सापळ्यात सटाण्याचा भूमी अभिलेख कार्यालयाचा उपअधीक्षक ५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ सापडला. याप्रकरणी सटाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवेंद्र मधुकर भावसार ( ५१, रा. सिडको, नाशिक) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदाराच्या फिर्यादीनुसार, सटाणा शहरातील नेहरू रोड, कोर्ट गल्ली येथील भूमापन क्रमांक ७९९ मधील वडिलोपार्जित घरावर मयत वडिलांच्या नावानंतर वारसा हक्काने नाव लावण्याचे काम एका ४८ वर्षीय व्यापाऱ्याचे प्रलंबित होते. हे काम करून देण्यासाठी उपअधीक्षक देवेंद्र भावसार याने पैशांची मागणी केली होती. तक्रारदाराने २८ ऑक्टोबरला केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ''एसीबी''च्या पथकाने भूमी अभिलेख कार्यालयातील भावसार याच्या कक्षात पंचासमक्ष पडताळणी केली असता, त्याने ५०० रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सोमवारी (ता.२) सायंकाळी सातच्या सुमारास ''एसीबी''ने भूमी अभिलेख कार्यालयात सापळा रचला. तक्रारदाराकडून ५०० रुपयांची लाच स्वीकारताच भावसार याला पथकाने पकडून ताब्यात घेतले. याप्रकरणी सटाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘लाचलुचपत’चे अधीक्षक भारत तांगडे, अपर अधीक्षक प्रदीप मैराळे, कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विकास लोंढे, पर्यवेक्षक अधिकारी स्वप्निल राजपूत, हवालदार प्रभाकर गवळी, किरण धुळे यांनी कारवाई केली.