प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यातील
बोढरेचे अकरा आरोपी निर्दोष
सकाळ वृत्तसेवा
चाळीसगाव, ता. २२ ः बोढरे (ता. चाळीसगाव) येथील महिलेसह तिच्या आईवर तलवार आणि लाकडी दांडक्यांनी प्राणघातक हल्ला केल्याच्या प्रकरणात जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने ११ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. साक्षीदारांच्या जबानीतील तफावती, त्यांच्या साक्षीतील अविश्वासार्हता आणि तपासातील त्रुटींचा विचार करून न्यायालयाने हा निर्णय दिला.
याबाबत माहिती अशी, २७ सप्टेंबर २०१७ रोजी बोढरे येथे मायाबाई जाधव, त्यांच्या आई शोभाबाई खैरे यांना गावातील काही जणांनी तलवार व लाकडी दांडक्यांनी मारहाण केली होती. जखमींना सरपंचांसह इतर ग्रामस्थांनी चाळीसगावला रुग्णालयात दाखल केले. तेथून पुढील उपचारासाठी त्यांना धुळे येथे पाठविण्यात आले. याप्रकरणी मायाबाईंच्या फिर्यादीवरून ११ आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. जळगावच्या जिल्हा व सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे फिर्यादी मायाबाई, त्यांची आई शोभाबाई, भाऊ विकास यांच्यासह पंच तसेच धुळे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन पवार, डॉ. बापू बाविस्कर, पोलिस कर्मचारी किशोर सोनवणे, भारत सोनवणे, गणपत महिरे आणि तपासी अधिकारी सहायक निरीक्षक दीपक बोरसे यांच्यासह एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या जबानीतील तफावती, साक्षीतील अविश्वासार्हता आणि तपासकामातील त्रुटींचा विचार करून न्यायालयाने सर्व ११ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. आरोपींतर्फे ॲड. वसंत ढाके यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. भारती ढाके, ॲड. श्याम जाधव आणि जगदीश राठोड यांनी सहकार्य केले.
------------------------