धुळे ः टुडे जिल्हा पानासाठी
---
प्राचार्यांवरील निलंबनाबाबत निर्णय रद्द
पिंपळनेर एज्युकेशन सोसायटी प्रकरणी खंडपीठाचा निकाल
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ९ ः सेवापूर्तीच्या अवघ्या काही दिवसांपूर्वी कर्मवीर पिंपळनेर (ता. साक्री) येथील आ. मा. पाटील महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य डॉ. एस. टी. सोनवणे यांच्यावर संस्थेने केलेली निलंबनाची आणि विभागीय चौकशीची कारवाई मनमानी, अवाजवी, अतार्किक असल्याचे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने संस्थेचा निर्णय रद्द ठरवला आहे. या निकालामुळे संस्थाचालकांच्या मनमानी कारभाराला चपराक बसल्याचे मानले जात आहे.
पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीच्या कर्मवीर आ. मा. पाटील महाविद्यालयात डॉ. एस. टी. सोनवणे यांनी ३८ वर्षे प्राध्यापक व प्राचार्य म्हणून सेवा बजावली. ते ३१ जुलै २०२२ ला निवृत्त होणार होते; परंतु त्यापूर्वीच ११ जुलै २०२२ ला संस्थेने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत निलंबित केले आणि विभागीय चौकशी प्रस्तावित केली. ही नोटीस व निलंबनाचे पत्र त्यांना २६ जुलै २०२२ ला म्हणजेच निवृत्तीच्या अवघ्या पाच दिवस आधी मिळाले. या कारवाईविरोधात डॉ. सोनवणे यांनी खंडपीठात रिट याचिका दाखल केली.
खंडपीठाची निरीक्षणे
न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी आणि न्यायमूर्ती आबासाहेब डी. शिंदे यांच्या खंडपीठाने प्रकरणाच्या मूळ कागदपत्रांची तपासणी केली. त्यानुसार निकालात स्पष्ट केले, की संस्थेने डॉ. सोनवणे यांच्यावर लावलेले आरोप अस्पष्ट, संदिग्ध आणि विनाकारण सरमिसळ केलेले आहेत. याचिकाकर्त्याविरुद्ध कोणताही गंभीर गैरव्यवहाराचा ठोस आरोप रेकॉर्डवर दिसून येत नाही. निवृत्तीच्या उंबरठ्यावर अचानक अशा प्रकारे निलंबन करणे हा संस्थेचा मनमानी, अवाजवी आणि नंतर सुचलेला दुर्भावनापूर्ण प्रयत्न होता. खंडपीठाने डॉ. सोनवणे यांची रिट याचिका मंजूर करत संस्थेचा ११ जुलै २०२२ चा निलंबन व चौकशीचा आदेश फेटाळून लावला. तसेच याचिकाकर्त्याचे प्रलंबित पेन्शन प्रकरण, भविष्य निर्वाह निधी आणि आधीच्या अंतरिम आदेशानुसार ५० टक्के उपदान (ग्रॅच्युइटी) देण्याचे आदेश बहाल केले. या प्रकरणी याचिकाकर्त्यातर्फे ॲड. सुधीर बारलिंगे यांनी कामकाज पाहिले. त्यांना ॲड. कल्याण पाटील यांनी सहकार्य केले.